राहुल गांधींनी भगवा झेंडा हातात घेतला तर आम्ही काँग्रेससोबत युती करायला तयार आहोत – गुलाबराव पाटील

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार भाजपसोबत जाणार असल्या चर्चा चांगल्याच रंगल्या होत्या. त्यावर अनेक प्रतिक्रिया देखिल आल्या होत्या. त्यानंतर अजित पवार यांनी त्यांनी भूमिका स्पष्ट करत मी राष्ट्रवादीसोबतच राहणार असे सांगितले.

असं असताना शिवसेना नेते आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी थेट काँग्रेससोबत मिळवणी करण्याचं विधान केलं आहे. आम्ही काँग्रेस सोबत युती करायला तयार आहोत, असं मोठं विधान गुलाबराव पाटील यांनी केलं आहे. मात्र, त्याचबरोबर गुलाबराव पाटील यांनी एक अटही घातली आहे. आता ही अट काँग्रेस मान्य करणार काय? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

गुलाबराव पाटील म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांनी हे पूर्ण आयुष्य काँग्रेसच्या विरोधात संघर्ष केला. त्या काँग्रेसवाल्यांनी आमचे पठ्ठे फोडले. त्यांच्याबरोबर आम्ही बिलकुल जाणार नाही. राहुल गांधी यांनी भगवा झेंडा हातात घ्यावा. त्यांनी जर भगवा झेंडा हातात घेतला तर आम्ही काँग्रेससोबत युती करायला तयार आहोत.

गुलाबराव पाटील म्हणाले, यापूर्वीच आम्ही उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडी होण्याआधी सावध केले होते की पुढे रेड झोन आहे. गाडी फेल होईल. जाऊ नका. आपण आता इथेच गाडी थांबवली पाहिजे. रस्ता चुकीचा दिसतोय. मात्र गाडीतले संजय राऊतसारखे काही चुकीचे कंडक्टर आणि ड्रायव्हर भेटले. त्यामुळे गाडीचा अपघात झाला. गाडी दिशाहीन झाली, असे म्हणत गुलाबराव पाटलांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना टोला लगावला.