मुंबई : नागपूर येथे काल नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे लोकार्पण झाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नातून साकार झालेल्या या प्रकल्पाचे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कौतुक केले आहे.पत्रकारांशी बोलताना राऊत म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांचे वडिल कॅन्सरने गेले होते. त्या वेदनेतून त्यांनी नागपुरात भव्य असे कॅन्सर इस्पितळ बनवले आहे. त्यांचे या रुग्णालयासाठी कौतुकच आहे. हा प्रकल्प शासकीय नसून सामाजिक संस्थांनी उभारला आहे. याचे आम्ही स्वागतच करतो.
आम्हाला याचा गौरव आहे. यामध्ये राजकीय टीका होऊ शकत नाही. चांगले काम उभे केले आहे.
देवेंद्र फडणवीस यांचे वडील गंगाधरराव यांना कॅन्सर झाला होता.उपचारासाठी मुंबईतील टाटा हॉस्पिटलमध्ये आणावे लागले. टाटा हॉस्पिटलमध्ये देश भरातून कॅन्सरचे रुग्ण उपचारासाठी येतात. त्यामुळे टाटा हॉस्पिटलवर लोड प्रचंड होता. हे सर्व बघून व्यथित न होता तेव्हाच मनात ठरवलं की, नागपूरमध्ये टाटा सारख अत्याधुनिक कॅन्सर हॉस्पिटल उभं राहिलं पाहिजे.
जे आपल्या सोबत झालं ते गोरगरिबांच्या बाबतीत होऊ नये या भावनेतून त्यांनी काम सुरू केले. मुख्यमंत्री झाल्यावर 28 फेब्रुवारी 2015 मध्ये नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे भूमिपूजन केले. उभारणीसाठी सातत्याने पाठपुरावा केला. स्वतः जातीने लक्ष दिले. यातून 470 बेडचं अत्याधुनिक नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट उभी राहिली. सर्व प्रकारच्या कर्करोगांवर उपचार करण्यात येणार आहे.
धर्मादाय पद्धतीने चालणारं हे देशातील सर्वात मोठे कॅन्सर रुग्णालय असणार आहे. कर्करोगाच्या रुग्णांना संजीवनी देणारी संस्था म्हणून नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटकडे पाहिलं जात आहे. या हॉस्पिटलमध्ये देशातील सर्व प्रमुख प्रादेशिक भाषेत लिहलं आहे की, ‘मैं कर्क योद्धा हूं’ यातून रुग्ण जरी आसाम, बंगाल मधून आला हे वाचल्यावर त्यालाही जगण्याची संजीवनी याच हॉस्पिटलमधून मिळेल, तसेच आपलेपणाची ऊब ही त्याला जाणवेल.
