महाराष्ट्रातील १४७ कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी आज मतदान

आज राज्यातील 147 बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे.तर रविवारी (दि.30) उर्वरित 88 बाजार समित्यांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सर्व तयारी करण्यात आली आहे. सर्वच पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

दरम्यान, एकूण 253 कृषी उत्पन्न बाजार समित्यांची निवडणूकांपैकी 18 बाजार समित्यांची निवडणूक प्रक्रिया बिनविरोध झाल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

बाजार समित्यांसाठी आज (28 एप्रिल) मतदान होणार आहे. तर 30 एप्रिलला मतमोजणी पार पडणार आहे. सर्वच राजकीय पक्षांनी बाजार समितीच्या निवडणुकीसाठी जोरदार प्रचार केला होता. त्यामुळं राज्यात अनेक ठिकाणी चुरशीच्या लढती होत आहेत.

28 एप्रिल रोजी मतदान होणार्‍या 147 कृषी उत्पन्न बाजार समित्यांपैकी 37 बाजार समित्यांची मतमोजणी 28 एप्रिल रोजी, 95 समित्यांची मतमोजणी 29 एप्रिल रोजी तर 15 समित्यांची मतमोजणी 30 एप्रिल रोजी रोजी होणार आहे. 88 पैकी 78 समित्यांची मतमोजणी 30 एप्रिल रोजी तर 10 समित्यांची मतमोजणी 1 मे रोजी होणार आहे, असेही डॉ. खंडागळे यांनी सांगितले.