भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर महिला कुस्तीगिरांनी लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. त्याप्रकरणी शुक्रवारी ( २८ एप्रिल ) ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात दिल्ली पोलिसांनी दोन गुन्हे दाखल केले आहेत. यानंतर आता पहिल्यांदाच ब्रिजभूषण सिंह यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मी पूर्णपणे निर्दोष आहे. त्यामुळे आरोपी बनून राजीनामा देणार नाही, असं ब्रिजभूषण सिंह यांनी सांगितलं. “माझी कोणाविरोधात तक्रार नाही. सर्व प्रकारच्या चौकशीला सहकार्य करणार आहे. माझा तपास यंत्रणांवर विश्वास असून, मला न्याय मिळेल,” असा विश्वास ब्रिजभूषण सिंह यांनी व्यक्त केला.
आपल्यावर लावण्यात आलेल्या आरोपांबाबत भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह म्हणाले, ‘पाहा, न्यायपालिकेच्या निर्णयाने मी आनंदी आहे. दिल्ली पोलिसांनी तपास हाती घेतला आहे. मी कुठेही पळत नाही. मी फक्त माझ्या घरी आहे. तपासात जेथे सहकार्य हवे असेल तेथे मी सहकार्य करण्यास तयार आहे. या देशात न्यायव्यवस्थेपेक्षा कोणीही मोठा नाही. मीही न्यायव्यवस्थेपेक्षा मोठा नाही.
“जंतमंतरवर पप्पू यादव, अरविंद केजरीवाल यांच्यासारखे नेते का येत आहेत? प्रियंका गांधींनीही जंतरमंतरवर भेट दिली. पण, प्रियंका गांधींना माहिती नाही की, दीपेंद्र हुड्डांनी माझ्याविरोधात कट रचला आहे,” असेही ब्रिजभूषण सिंह म्हणाले.
