राज्यातील प्रत्येक तालुक्यात कामगार सेतू नोंदणी केंद्र उभारणार – कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे

राज्याच्या अर्थव्यवस्थेत कामगार महत्त्वाचा घटक असून कामगारांच्या कल्याणाला राज्य शासनाचे प्राधान्य आहे. राज्यातील सर्व कामगारांना योजनांचा लाभ मिळावा म्हणून प्रत्येक तालुक्यामध्ये सर्व प्रकारच्या कामगार नोंदणीसाठी कामगार सेतू नोंदणी केंद्र, नाक्यावरील कामगारांकरीता कामगार निवारा उभारणार आहे, असे कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी सांगितले.

चिंचवड येथे आयोजित राज्यस्तरीय कामगार सन्मान सोहळ्याच्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, अश्विनी जगताप, कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंघल, कामगार आयुक्त सतिश देशमुख, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाचे सचिव विवेक कुंभार, पुणे विभागाचे अपर कामगार आयुक्त शैलेद्र पोळ, कोकण विभागाचे अपर कामगार आयुक्त शिरीन लोखंडे, औद्योगिक सुरक्षा व जन आरोग्य संचालनालय पुणे विभागाचे संचालक एम. आर. पाटील, बाष्पके विभाग पुणे विभागाचे संचालक डी. पी. अंतापुरकर, कामगार कल्याण आयुक्त रविराज इळवे आदी उपस्थित होते.

कामगारांना हक्काच्या सर्व सोईसुविधा मिळाव्यात यासाठी प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन उभारण्यात येईल. कामगारांना आरोग्यविषयक सर्व सुविधा एकाच ठिकाणी मिळण्यासाठी राज्यात ६ मल्टीस्पेशालटी रुग्णालय उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे. याचप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यात असे रुग्णालय उभारण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

कामगारांचा अपघात झाल्यावर त्यांचा कुटुंबाला आर्थिक मदत मिळण्यासाठी विमा कंपनीबाबत योजना तयार करण्यात येत आहे. सुरक्षा मंडळातील कर्मचारी, अर्धवेळ काम करणाऱ्या कामगाराला एक हजार रुपये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे, असेही त्यांनी सांगितले.

डॉ. सुरेश खाडे पुढे म्हणाले, कामगारांना शासनाच्या योजनांची माहिती देणाऱ्या पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले असून ही पुस्तिका सर्व तालुक्यात पोहोचविण्यात यावी. कामगारांना आवश्यक त्या सर्व सोई-सुविधा उपलब्ध करुन देणार असून याकरिता या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींकडून सल्ला घेण्यात येईल. प्रामाणिकपणे काम करा, उद्योगवाढीसाठी प्रयत्न करा. उद्योग टिकला तर कामगार टिकेल असा संदेश देत त्यांनी कामगारांना नोंदणी करण्याचे आवाहनही केले.