भारतीय जनता पक्षाने शिवसेनेसोबतची युती तोडली असा आरोप ठाकरे गटाकडून केला जातो. मात्र शिवसेना भाजप युती टिकवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनीच प्रयत्न केले. सर्वात मोठा पक्ष असूनही कमीपणा घेत शिवसेनेबरोबरचं नातं मजबूत करण्याची धडपड करताना ते दिसत होते, असे निरीक्षण शरद पवार यांनी नोंदविले आहे.लोक माझी सांगाती या आत्मचरित्रात शरद पवार यांनी 2014 मधील राजकारणाबाबत सविस्तर लिहिले आहे.
युतीबाबत ते म्हणतात, फडणवीस यांनी सरकार टिकवून ठेवण्यासाठी आणि स्थैर्यासाठी ‘मातोश्री’वर जात उद्धव ठाकरे यांच्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न चालवला. निर्विवादपणे सर्वात मोठा पक्ष असूनही कमीपणा घेत शिवसेनेबरोबरचं नातं मजबूत करण्याची धडपड करताना ते दिसत होते.त्याचबरोबर पक्ष वाढविण्यासाठी फडणवीस यांनी केलेल्या प्रयत्नांचीही शरद पवार यांनी कौतुक केले आहे. शिवसेनेशी असलेलं नातं एकीकडे टिकवत असताना दुसरीकडे भाजपाचा विस्तार करायचा, पक्षाची ताकद वाढवायची, असं त्यांचं एकंदरीत उद्दिष्ट दिसत होतं.
स्वपक्षाची ताकद फडणवीस वाढवताहेत, हे शिवसेनेला थोडं उशिरा उमगलं. फडणवीस यांचं खरं लक्ष्य राष्ट्रवादी काँग्रेसच होती, असे सांगताना शरद पवार यांनी त्यामुळे आम्ही सावध झालो होतो, असेही म्हटले आहे.2014 मध्येच शिवसेनेला सोबत घेऊन काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार बनवायचे असाही शरद पवारांचा प्लॅन होता. यासाठी शिवसेना तयार होती असे त्यांनी सूचकपणे सांगितले आहे. मात्र काँग्रेसने त्याला मोडता घातला.पवार म्हणतात, भाजपा-शिवसेनेतली फारकत आणखी वाढली, तर काही घडवता येईल, हे स्पष्ट असूनही काँग्रेसचं केंद्रीय नेतृत्वही त्यासाठी फारसं आग्रही नव्हतं. किंबहुना, लोकसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर मानसिकतेत एक बदल झाला होता.
काँग्रेसच्या विचारांशी बांधिलकीचा वारसा सांगणारे कमकुवत झाले, तर काँग्रेस पक्षासाठी ते पथ्यकरच आहे, असा तो बदल होता. त्यामुळेच महाराष्ट्रात जे होईल ते ते हस्तक्षेपाविना पाहावं, असा पवित्रा काँग्रेसनं स्वीकारला होता. २०१४ ची निवडणूक काँग्रेस-राष्ट्रवादीनं एकत्रित लढवली असती, तर राज्य जिंकता आलं असतं, असा आम्हाला विश्वास होता. १९८९ नंतर प्रथमच युती मोडून दोन्ही पक्ष स्वबळावर लढले होते. त्यांच्यातल्या परस्परनात्यात झालेल्या बदलांमुळे हे सरकार चाललं, तरी त्यांच्यातली नैसर्गिक मैत्री आटलेली आहे. हे काही आता लपून राहिलेलं नव्हतं.
