उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज बारसू दौऱ्यावर आहेत. दरम्यान यावेळी त्यांनी राजापूरमध्ये पोहोचल्यानंतर सोलगावात रिफायनरी विरोधकांसोबत संवाद साधला. तर,”लोकांचा विरोध असल्यास रिफायनरी प्रकल्प आणू नका. हुकूमशाही लादू नका, अन्यथा महाराष्ट्र पेटवून देऊ” असा इशारा उद्धव ठाकरे यांनी यावेळी सरकारला दिला. दरम्यान यावरच शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया आली आहे. राज्य पेटवायची भाषा उद्धव ठाकरेंच्या तोंडी शोभत नाही, असा खोचक टोला शिरसाट यांनी लगावला आहे. छत्रपती संभाजीनगर येथील आपल्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषेदत शिरसाट बोलत होते.
संजय शिरसाट म्हणाले अवकाळी पाऊस पडतोय, त्यामुळे त्यांची आग विझून जाईल. विचार करा, जो मुख्यमंत्री सर्वांना भेटतो, याला जर हुकुमशाही म्हणता ? मुख्यमंत्र्यांनी तुमच्या सारख लॉक लावून वर्षामध्ये बसायचं का ?आमदार शिरसाट म्हणाले मुख्यमंत्र्यांच्या कामांमुळे जनेतला आपला मुख्यमंत्री आला आहे असे वाटत आहे. या मुख्यमंत्र्यांना जर तुम्ही हुकुमशाही म्हणत असाल तर तुम्ही लोकशाहीची माेठी थट्टा करीत आहात.
संजय राऊत यांच्यावर शिरसाट यांनी टीका केली आहे. संजय राऊत राजकरणातला घाणेरडा किडा आहे. त्यांना त्यांची जागा नाना पाटोले यांनी दाखवली आहे. आता त्यांना फक्त कार्यकर्त्यांनी रस्त्यावर जोडे मारायचं बाकी आहे. महाविकास आघाडी आता राहिली आहे का? लोकांच्या घरी मुलगा जन्मला म्हणून तुम्ही पेढे का वाटता? तुमच्या घरी जन्मल्यावर वाटा ना, असा टोला संजय शिरसाट यांनी लगावला आहे. आता महाविकास आघाडीची सभा होणार नाही. उद्धव ठाकरे यांच्या डोळ्यावर पट्टी आहे. त्यांना संजय राऊत सांगतील युद्धभूमीवर काय सुरू आहे ते, असंही ते म्हणालेत.
कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे सभा घेणार आहेत. त्यावर विरोधक टीका करत आहेत. त्याला संजय शिरसाट यांनी उत्तर दिलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कर्नाटकात गेले तर काय झालं? शिवसेना-भाजपची युती आहे, युतीची सत्ता आहे. त्यामुळे एकमेकांना सहकार्य करावं लागतं. त्यामुळे मुख्यमंत्री कर्नाटकात गेले तर त्यात चूक काय?, असा सवालही संजय शिरसाट यांनी विचारला आहे.
