राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्ष अध्यक्षपदाचा राजीनामा परत घेतला आहे. शरद पवार यांच्या राजीनाम्याने राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले होते. शरद पवार यांच्या राजीनामा नाट्याने अजित पवार यांची कोंडी झाल्याच्या चर्चा आता रंगू लागल्या आहेत.मात्र अजित पवार यांचं बंड अजूनही थांबलेलं आहे असं वाटत नाही, म्हणत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी नवा दावा केला आहे, ज्यामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
अंजली दमानिया यांनी शरद पवार यांच्या राजीनाम्यावरही भाष्य केलं आहे. शरद पवार हे त्यांच्या बोलण्यावर ठाम राहिले असते तर सगळ्यांना आनंद झाला असता. त्यांनी राजीनामा दिला होता. त्यावर ठाम राहायला हवं होतं. नव्या नेतृत्वाला संधी द्यायला हवी होती. पण ते शरद पवार आहेत. ते शेवटपर्यंत सत्ता सोडणार नाहीत. शेवटपर्यंत पद सोडणार नाहीत, असा दावा अंजली दमानिया यांनी केला आहे.
शरद पवार यांनी खेळी करून बॅटही माझी आणि चेंडूही माझा हे दाखवून दिलं आहे. पण ही स्टोरी बोगस स्टोरी आहे. येत्या काही दिवसात ते दिसून येईल. अजित पवार यांची खेळी अजून संपलेली नाही. येत्या काही दिवसात ते आपल्या आमदारांना गोळा करून मोठा दगाफटका करतील, तसेच येत्या महिन्यात म्हणजे दिवाळीपर्यंत ते पुन्हा काही दगाफटका करतील यात शंका नाही, असे भाकितही अंजली दमानिया यांनी वर्तवले आहे. दमानिया यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
