पक्ष नसलेल्या पक्षाचे प्रमुख आता म्हणतात की लोकांच्या भावना असतील तसं होईल – राज ठाकरे

मनसे प्रमुख राज ठाकरेंनी शनिवारी रत्नागिरीतील सभेतून कोकणातील प्रकल्पांवरून उद्धव ठाकरेंवर तिरकस निशाणा साधला. यावेळी पवारांच्या राजीनाम्यावर भाष्य करताना खोचक चिमटेही त्यांनी काढले. पक्ष नसलेल्या पक्षाचे अध्यक्ष आज बारसूला येऊन गेले. लोकांची जी भावना आहे ती आमची भावना आहे असे ते म्हणाले. मग मुंबईचा महापौर बंगला काय लोकांना विचारुन ढापला का? अशा शब्दांत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर नाव न घेता निशाणा साधला.

बारसू प्रकल्पाबाबत ठाकरे गटाच्या भूमिकेवर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, ठाकरे गटाची भूमिका नक्की काय आहे रिफायनरींबाबत? खासदार म्हणतात होणार नाही, पक्ष नसलेल्या पक्षाचे प्रमुख आता म्हणतात की लोकांच्या भावना असतील तसं होईल. मग बाळासाहेबांच्या स्मारकासाठी मुंबईचा महापौर बंगला हडपलात तेंव्हा जनतेला विचारलंत? शिवसेनेची रिफायनरीसाठी भूमिका नक्की काय आहे? असा सवाल त्यांनी शिवसेनेला केला आहे. इथल्या जमिनी हड्पणे, त्यातून बक्कळ पैसा कमवणं इतकंच इथल्या लोकप्रतिनिधींचं उद्दिष्ट आहे हे विसरू नका. माझी कोकणवासीयांना हात जोडून विनंती आहे की तुम्हाला फसवणाऱ्या ह्या लोकांना एकदा धडा शिकवाच. असे त्यांनी आवाहन करत त्यांनी उध्दव ठाकरेंचे नाव न घेता टीका केली.

शरद पवारांना खरंच राजीनामा द्यायचा होता. पण अजित पवार त्या दिवशी जसे वागले ते पाहून त्यांनी राजीनामा मागे घेतला असावा असे मला वाटते असे राज ठाकरे म्हणाले. अजित पवार त्या दिवशी जसे वागत होते, ते पाहून पवारांनी त्यांचा निर्णय बदलला असावा. पवारांनी राजीनामा दिला त्या दिवशी अजित पवारांचे ए तू गप्प बस, ए तू शांत बस, कार्यकर्त्यांच्या हातातला माईक घे, असे सुरू होते. हे पाहून पवारांना वाटले असेल की हा आताच असे वागतो, उद्या मी राजीनामा दिल्यावर उद्या मलाही म्हणेल गप्प बस. त्या भितीपोटी त्यांनी राजीनामा मागे घेतला असावा असे राज ठाकरे म्हणाले.