ताई, विषय समजून घ्या, सरकार बदलले म्हणून मुली बेपत्ता व्हायला लागल्या का? चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंना सवाल

नॅशनल क्राइम ब्युरोने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीत देशातील सर्वच राज्यात मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढल्याचे म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्र शासनावर प्रश्न उपस्थित केले आहेत. यावरून भारतीय जनता पक्ष महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी विषय समजून घ्या, सरकार बदलले म्हणून मुली बेपत्ता व्हायला लागल्या का? असा सवाल केला आहे.

सुळे यांनी याबाबत म्हटले आहे की, मुलींची दिशाभूल करुन त्यांचे अपहरण करण्याचे प्रकारही वाढले आहेत. या बेपत्ता मुलींचे पुढे काय होते हा प्रश्न शासनाला पडत नाही का? पडत असेल तर त्यावर उपाययोजना करण्यासाठी शासकीय स्तरावर काही होत आहे का? याबाबत महिलांच्या संबंधाने काम करणाऱ्या व्यक्ती, स्वयंसेवी संस्था, सामाजिक क्षेत्रातील तज्ज्ञ यांची मते जाणून घेऊन उपाययोजना करणे गरजेचे आहे. हा विषय अतिशय गंभीर असून गृह तसेच महिला व कुटुंब कल्याण विभागाने एकत्र येऊन याबाबत तातडीने काम करण्याची आवश्यकता आहे.

यावर चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळातील आकडेवारी दिली आहे.महाराष्ट्र असो की अन्य कुठले राज्य,मुली-महिलांचे बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढत असेल तर ते चिंताजनकच आहे पण आपण अशा थाटात हा विषय मांडला जणू सरकार बदलले आणि मुली बेपत्ता व्हायला लागल्या असे सुनावत चित्रा वाघ म्हणतात, आधी विषय समजून घ्या.

महाराष्ट्रात दरवर्षी सरासरी 4000 मुली आणि 64,000 महिला बेपत्ता होतात. अगदी महाविकास आघाडीचे सरकार पाहिले तरी 2020 मध्ये 4517 मुली आणि 63,252 महिला बेपत्ता झाल्या. 2021 मध्ये 3937 मुली आणि 60,435 महिला बेपत्ता झाल्या. मुली बेपत्ता झाल्याच्या प्रकरणात सरासरी 90 टक्के प्रकरणात डिटेक्शन होते, तर महिलांच्या बाबतीत 75 टक्के डिटेक्शन होते. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे प्रत्येक अल्पवयीन मुलीच्या बाबतीत एफआयआर दाखल केला जातो. निश्चितच ही समस्या गंभीर आहे. राजकीय अभिनिवेश बाजुला ठेवून प्रत्येक महिला नेत्यांनी एकत्र येत यावर उपाय सूचविले पाहिजेत केवळ टीकेसाठी टीका करुन प्रश्न सुटत नसतात, असेही वाघ यांनी सुळे यांना सुनावले आहे.