मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचं निधन

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते, मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचे ह्दयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. विश्वनाथ महाडेश्वर यांनी वयाच्या ६३ व्या वर्षी अखेरचा श्र्वास घेतला. त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी सांताक्रूझ पूर्व, पटेल नगर सर्विस रोड येथील राजे संभाजी विद्यालयात दुपारी 2 वाजता ठेवण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे, त्यानंतर दुपारी 4 वाजता अंत्ययात्रा टीचर्स कॉलोनी येथील स्मशान भूमीच्या दिशेने निघेल.

2017 ते 2019 या काळात विश्वनाथ महाडेश्वर हे मुंबई महापालिकेचे महापौर होते.विश्वनाथ महाडेश्वर यांचा जन्म 15 एप्रिल 1960 रोजी झाला होता. त्यांनी मुंबईतील रुईया महाविद्यालयातून पदवीचं शिक्षण घेतलं. तसेच ते सांताक्रूझमधील राजे संभाजी विद्यालयाचे माजी प्राचार्य होते. 2002 मध्ये महाडेश्वर पहिल्यांदा नगरसेवक पदावर निवडून आले. त्यानंतर 2017 मध्ये ते मुंबईच्या महापौर झाले. 2017 ते 2019 या कालावधीदरम्यान त्यांनी मुंबईचं महापौरपद भूषवलं. तसेच 2019 त्यांनी विधानसभेची निवडणूकही लढवली होती.

विश्वनाथ महाडेश्वर यांच्या निधनाने ठाकरे गटाचं मोठं नुकसान झालं आहे. त्यांच्या अंत्ययात्रेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसह इतर शिवसैनिक उपस्थित राहतील. गेल्या काही दिवसांपासून महाडेश्वर यांची तब्येत ठिक नव्हती. काही दिवसांपूर्वीच ते कणकवली गावाहून मुंबईला पोहोचले होते.