शिक्षक भरती ऑगस्टमध्ये, संचमान्यता अंतिम झाल्यानंतर पवित्र पोर्टल होणार ॲक्टिव्ह

तब्बल अडीच लाख बेरोजगार उमेदवारांना प्रतीक्षा असलेल्या शिक्षक भरतीचा मुहूर्त येत्या ऑगस्ट महिन्यात निघाला आहे. सध्या कार्यरत शिक्षकांची संचमान्यता १५ मेपर्यंत पूर्ण करून त्यानंतर नव्या शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टल ॲक्टिव्ह करण्याचे नियोजन प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी शालेय शिक्षण विभागाला कळविले आहे.फेब्रुवारी-मार्चमध्ये शिक्षक भरतीसाठी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी घेण्यात आली.

२४ मार्च रोजी या परीक्षेतील दोन लाख ४० हजार डीएड, बीएडधारकांचा निकालही जाहीर करण्यात आला.दोन महिने उलटूनही शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलवर कुठल्याही हालचाली होत नसल्याने उमेदवारांमध्ये अस्वस्थता पसरली होती. याच दरम्यान उमेदवारांनी या संदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यामुळे शासनाला आता पद भरतीचे वेगवान नियोजन करावे लागणार आहे. या नियोजनाबाबत शिक्षण संचालनालयाने शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांकडे शिक्षक पद भरतीच्या कार्यवाहीबाबत पत्र पाठवले आहे.

15 मे पर्यंत विद्यार्थ्यांच्या आधार जोडणीचे काम पूर्ण करुन 2023-24 वर्षाची संच मान्यता करण्याच्या प्रक्रियेनंतर राज्यातील शिक्षकांच्या एकूण रिक्त पदांचं चित्र स्पष्ट होईल, त्यानंतर शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरु केली जाणार आहे