सामना अग्रलेखाला आमच्या लेखी काही महत्त्व नाही; अग्रलेखावरून शरद पवारांनी संजय राऊतांना सुनावलं

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि तो चार दिवसानंतर मागेही घेतला. यासंदर्भात दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून भाष्य करण्यात आलं होते. ‘सामना’च्या अग्रलेखातून पहिल्यांदाच शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या उणीवा दाखवत टीका करण्यात आली. शरद पवार हे राजकीय वारसदार निर्माण करण्यात अपयशी ठरल्याचा थेट हल्ला प्रथमच अग्रलेखातून करण्यात आला होता. शरद पवार यांच्यानंतर पक्ष पुढे नेणारे नेतृत्व पक्षात उभे राहू शकले नाही. पवार हे राष्ट्रीय पातळीवर मोठे नेते नक्कीच आहेत व त्यांच्या शब्दाला राष्ट्रीय राजकारणात मान असला तरी पक्ष पुढे नेईल असा वारसदार निर्माण करण्यात ते अपयशी ठरल्याचे म्हटले होते. आता या टीकेवर शरद पवार यांनी प्रथमच उत्तर दिले आहे.

सामना अग्रलेखाला आमच्या लेखी काही महत्त्व नाही, आम्ही पक्षात काय करतो हे संजय राऊत यांना माहिती नाही. आम्ही आमचं काम करत आहोत त्यांना काहीही लिहू देत. राष्ट्रवादीने अनेकांना कॅबिनेट मंत्री करून संधी दिली. त्यामुळे आमच्यावर कोणही टीका केली तर आम्ही दुर्लक्ष करतो, अशा शब्दात शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावलं आहे.

शरद पवार कर्मवीर भाऊराव पाटील यांची ६४ वी पुण्यतिथीनिमित्त साताऱ्यात आले. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले. दरम्यान आपण राजीनामा का मागे घेतला यावर देखील शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कार्यकर्त्यांनी रोखलं म्हणून थांबता आलं नाही असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत घ्यायचं का नाही याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून मविआच्या घटक पक्षात चर्चा सुरू आहे. यावर देखील शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अद्याप जागा वाटपाबाबत कोणतीही चर्चा सुरू सुरू नाहीये. वंचितबाबत सर्व घटक पक्षांशी बोलून निर्णय घेतला जाईल असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे.