गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशात अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. त्यामुळे शेतीचं प्रचंड नुकसान होऊन शेतकरी हवालदिल झालेला आहे. यामध्ये आता भारतीय हवामान विभागाने तापमान वाढीचा इशारा दिला आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक असल्याचं सांगण्यात येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून पावसामुळे तापमानाचा पारा 40 अंशांच्यावर गेला नव्हता मात्र आता हा तापमानाचा पारा 42 अंशावर पोहचणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.राष्ट्रीय राजधानीसह देशाच्या बहुतांश भागात अवकाळी पावसामुळं वातावरण आल्हाददायक होते.
पावसामुळं गेल्या काही दिवसांपासून बहुतांश भागातील कमाल तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षा कमी नोंदवले जात होते. मात्र, सुरुवातीच्या काही दिवस दिलासा मिळाल्यानंतर पुन्हा एकदा कडाक्याचे ऊन पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसची वाढ होण्याचा इशारा हवामान विभागानं वर्तवला आहे.
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार या संपूर्ण आठवड्यात देशातील बहुतांश राज्यांमध्ये हवामान स्वच्छ राहील. तसेच 13 मे रोजी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र, त्यामुळं तापमानात घट होणार नसल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. आज (10 मे) राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 21 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. तसेच हवामान स्वच्छ राहील. राजस्थानमध्येही येत्या काही दिवसांत कोरडे हवामान राहणार आहे. तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअस वाढ होण्याची दाट शक्यता आहे. आज राज्याच्या काही भागात कमाल तापमान 42 ते 44 अंशांपर्यंत नोंदवले जाऊ शकते.विदर्भातील अनेक जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढणार आहे.
विदर्भातील नागपूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये कमाल तापमानात 5 ते 7 अंशांची वाढ होऊन पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या तापमानामुळे उष्माघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. संपूर्ण एप्रिल महिना आणि मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावत उन्हाळ्यावर मात केली होती. मात्र आता राज्यात उन्हाचा तडाखा वाढणार आहे.
