आगामी 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला रोखण्यासाठी विरोधी पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. विरोधी पक्षातील नेते एकमेकांना भेटून चर्चा करत आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारदेखील आज महाराष्ट्र दौऱ्यावर असून ते आज उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत. या भेटीदरम्यान पुढील रणनीतीवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
लोकसभेच्या 2024 च्या निवडणुकांना आता केवळ एक वर्ष बाकी असताना विरोधी पक्षांकडून देखील या निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. पंधरा दिवसांपूर्वी दिल्लीत नितीश कुमार यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्यानंतर ते मुंबई दौऱ्यावर येत आहेत.
दरम्यान, नितीश कुमारच नाही तर केसीआर यांनी याआधी इतर राज्यांमध्ये जाऊन अखिलेश यादव आणि नितीश कुमार यांसारख्या दिग्गज विरोधी नेत्यांचीही भेट घेतली आहे, परंतु आतापर्यंत विरोधी पक्षातील एकाही नेत्याच्या नावावर पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून एकमत झालेले नाही. विरोधी पक्षात शरद पवार, नितीश कुमार, केसीआर, ममता बॅनर्जी असे अनेक बडे नेते पंतप्रधानपदाचे दावेदार मानले जातात.
