एकनाथ शिंदेंच मुख्यमंत्री राहणार; आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला

राज्याच्या सत्तासंघर्षाचा निकाल अखेर हाती आला आहे. सुप्रीम कोर्टाकडून 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय आता अध्यक्षांकडे सोपवण्यात आला आहे. अध्यक्षानं ठराविक कालावधीमध्ये आमदारांच्या अपात्रेसंबंधी निर्णय घ्यावा असं न्यायालयानं म्हटलं आहे. हा शिंदे गटासाठी मोठा दिलासा मानला जात आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंसाठी हा मोठा धक्का आहे. आता या सर्व प्रकरणावर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर निर्णय घेणार आहेत.

पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाने एकमताने हा निकाल दिला. सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी हा निकाल वाचून दाखवला. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठात न्यायमूर्ती एम आर शाह, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली, न्यायमूर्त पी एस नरसिंहा यांचा समावेश आहे.

सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी निर्णय देताना उद्धव ठाकरेंना दिलासा देण्यास नकार दिला. कोर्टानं म्हटलं की, उद्धव ठाकरे बहुमत चाचणीला समोरे गेले नाहीत. सुप्रीम कोर्टानं पुढे म्हटलं की, उद्धव ठाकरे यांनी बहुमत चाचणीला सामोरे न जाता राजीनामा दिला म्हणून ही स्थिती पूर्ववत करता येणार नाही. त्यामुळं सर्वात मोठा पक्ष भाजपच्या पाठिंब्यानं एकनाथ शिंदे यांना राज्यपालांनी शपथ देणे योग्य आहे.