कुणी राजीनामा घेऊन आले तर मी त्याला देऊ नको, असे म्हणणार का? भगतसिंह कोश्यारी

कुणी माझ्याकडे राजीनामा घेऊन आले तर मी त्याला राजीनामा देऊ नको, असे म्हणणार का? असा सवाल माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केला आहे.

कोश्यारी म्हणाले की, मी त्यावेळी जे निर्णय घेतले ते पूर्णपणे विचार करून घेतले होते. जर एखादा व्यक्ती माझ्याकडे राजीनामा घेऊन आला, तर मी त्याला, राजीनामा देऊ नको, असे म्हणणार का? सर्वोच्च न्यायालयाने जे काही म्हटले आहे त्यावर विश्लेषण करणे हे तुम्हा लोकांचे काम आहे. मी त्यावर बोलणार नाही. कोश्यारी म्हणाले, घटनेच्या नियमांच्या आधारे तेव्हा मी जे काही निर्णय घेतले ते विचारपूर्वक घेतले होते. आता जेव्हा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आलेला आहे त्यावर विश्लेषण करणे हे विधीज्ञांचे काम आहे, हे माझे काम नाही.

सर्वोच्च न्यायालयाने आज महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आपला निर्णय दिला आहे. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षातील 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांकडे पाठवला आहे. त्यामुळे आता 16 आमदारांच्या अपात्रतेबद्दलचा निर्णय राज्याच्या विधानसभा अध्यक्षांना घ्यावा लागेल यावर कोश्यारी म्हणाले की, मी राज्यपालपद सोडून आता तीन महिने झाले आहेत. मी राजकीय बाबींपासून नेहमीच अंतर ठेवून असतो. जो विषय सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी होता, त्यावर त्यांनी निर्णय दिला आहे. अशा बाबींवर कायद्याचे जाणकारच आपले मत व्यक्त करू शकतात. मी कायद्याचा अभ्यासक नाही, मी केवळ संसदीय कार्यशैली जाणतो, त्यामुळे मी यावर बोलणे उचित ठरणार नाही.