आयपीएल मध्ये आज गुजरात विरुद्ध मुंबई; वानखेडे स्टेडियमवर दोन्ही संघ प्रथमच आमनेसामने येणार

वानखेडे मैदानवर आज मुंबई इंडियन्स आणि गुजरात यांच्यात सामना रंगणार आहे. हा सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा आहे. मुंबईचा पराभव करुन प्लेऑफ मध्ये प्रवेश मिळवण्याचा गुजरातचा मानस आहे. तर गुजरातला हारवून प्लेऑफच्या शर्यतीत आपली जागा आणखी मजबूत करण्याचा उद्देश मुंबईचा असेल. त्यामुळे या दोन्ही संघातली आजची लढत ही धमाकेदार होणार असल्याच्या चर्चा आता रंगत आहेत.

गुजरात टायटन्सची टीम पॉइंट्स टेबलमध्ये टॉपवर आहे. आजचा सामना जिंकल्यास त्यांचा प्लेऑफमध्ये प्रवेश निश्चित होईल. मुंबई इंडियन्सकडे त्यांचा प्लेऑफ प्रवेशाचा मार्ग रोखण्याची संधी आहे. त्याचवेळी आज जिंकल्यास पॉइंट्स टेबलमध्ये मुंबईच स्थान अधिक भक्कम होईल. रोहित शर्माची टीम 12 पॉइंट्ससह चौथ्या स्थानावर आहे. अजून एक पराभव मार्ग कठीण बनवू शकतो. गुजरात आणि मुंबईमध्ये या सीजनमधील दुसरा सामना होणार आहे. सीजनमधील पहिल्या सामन्यात गुजरातची टीम 55 रन्सनी जिंकली होती.

मुंबई आणि गुजरात यांच्यातील एकूणच हेड-टू-हेडबद्दल बोलायचे झाले तर, दोन्ही संघ दोनदा आमनेसामने आले आहेत. ज्यामध्ये मुंबईला एक आणि गुजरातलाही एक विजय मिळाला. वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी उपयुक्त ठरते. त्याचबरोबर या मैदानावर धावा रोखण्यासाठी गोलंदाजांना खूप संघर्ष करावा लागतो. सामन्याच्या दिवशी मुंबईतील वातावरण खूप उष्ण असणार आहे. शुक्रवारी मुंबईचे तापमान 29 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील.

संभाव्य प्लेइंग – 11

मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, कॅमेरून ग्रीन, सूर्यकुमार यादव, टीम डेव्हिड, नेहल वढेरा, ख्रिस जॉर्डन, पियुष चावला, आकाश मधवाल, कुमार कार्तिकेय आणि जेसन बेहरेनडॉर्फ.

गुजरात टायटन्स : हार्दिक पंड्या (कर्णधार), ऋद्धिमान साहा (यष्टीरक्षक), शुभमन गिल, विजय शंकर, डेव्हिड मिलर, अभिनव मनोहर, राहुल तेवतिया, राशिद खान, नूर अहमद, मोहम्मद शमी आणि मोहित शर्मा.