पोलीस विभागाच्या आधुनिकीकरणामुळे गुणात्मक परिवर्तन झाले आहे. त्यामुळे शहरातील गुन्हेगारींचे प्रमाण कमी झाले असून कायदा व सुव्यवस्था असलेले शहर म्हणून नागपुरची नवी ओळख निर्माण झाली असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
लकडगंज येथील आधुनिक सोयीसुविधायुक्त पोलीस स्टेशन, पोलीस उपायुक्त कार्यालय तसेच 348 निवासी सदनिका असलेल्या निवासी संकुलाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी होते. यावेळी आमदार सर्वश्री प्रविण दटके, विकास कुंभारे, कृष्णा खोपडे, मोहन मते, टेकचंद सावरकर, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, गृहनिर्माण विभागाचे पोलीस महासंचालक संदिप बिष्णोई, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोजकुमार सुर्यवंशी, नागपूर स्मार्ट सिटीचे अजय गुल्हाने आदी उपस्थित होते.
पोलीसांसाठी निवास संकुल बांधण्याचा शासनाने निर्णय घेतला असून राज्यात 1 लक्ष सेवानिवास बांधण्यात येणार असल्याचे सांगतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पोलीस स्टेशनच्या बांधकामासोबत निवास संकुल बांधण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. पोलीस गृहनिर्माण विभागाने बांधकामामध्ये होत असलेला विलंब टाळुन सर्व सुविधायुक्त सेवानिवास प्रकल्पाला गती द्यावी अशी सुचना यावेळी केली.
नागपूर शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेवून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नवीन पोलीस स्टेशनसाठी प्रस्ताव तयार करावा. त्यानुसार मंजुरी देण्यात येईल. पोलीसांना हक्काचा निवारा मिळावा यासाठी कर्ज सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती. ही सुविधा सुरु राहावी यासाठी बँक ऑफ इंडिया सोबत करार करण्यात येत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. पोलिसांच्या आरोग्य तपासणीसाठी डिजिटल हेल्थ फाईल तयार करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
