राज्यात दंगली घडवून सत्तेत येण्याचा उद्धव ठाकरे यांचा प्रयत्न – नितेश राणे

महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांमध्ये लहान-मोठ्या दंगली उसळल्याचं पाहायला मिळालं. राम नवमीच्या दिवशी राज्यात तीन – चार ठिकाणी दगडफेक आणि जाळपोळ झाली. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री अकोला शहरातील हरिहरपेठ भागात दोन गटांमध्ये राडा झाला. या राड्याचं रुपांतर दंगलीत झालं. या राड्यात अनेक वाहनांची तोडफोड, जाळपोळ करण्यात आली आहे. तसेच दंगलखोरांनी काही दुचाकी आणि चारचाकी वाहनंही पेटवली. या घटनेत दोन्ही गटांमधील १० जणांसह दोन पोलीस कर्मचारीही जखमी झाले. यानंतर अहमदनगरच्या शेवगाव शहरात छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त रात्री निघालेल्या मिरवणुकीदरम्यान दोन समाजात आक्षेपार्ह घोषणांमुळे राडा झाला. त्यानंतर दगडफेक व जाळपोळ करण्यात आली. या दंगलींवरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.

दरम्यान आज (मंगळवार, १६ मे) भाजप नेते नितेश राणे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केलेत. “ह्या ज्या दंगली होत आहेत त्याचा मास्टर माईंड सिल्व्हर ओकमध्ये आलेला. शरद पवार साहेबांच्या बाजूला बसला होता. कलानगर हा त्याचा पत्ता आहे. दंगली घडवून मुख्यमंत्री होण्याची स्वप्न आजही जिवंत आहेत. 1993 ला दंगली झाल्या आणि 1995 ला सत्ता आली. अशी उद्धवजींची धारणा आहे.असं नितेश राणे म्हणाले आहेत.

ठाकरेगटाचे दोन नेते अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे एकमेकांचं तोंड बघत नव्हते. त्यांचे सूर मिळायला लागले आहे. ते आज पुन्हा एकत्र येत आहेत. हा दंगलीचा प्लॅन आहे का? मुसलमान समाजात दंगली घडवून आपला मतदान वाढवायचं हा उद्धवजींचा प्लॅन परत एकदा होतोय का? हे पवार साहेबांनी ओळखावं. त्र्यंबकेश्वर मंदिरात जबरदस्ती चादर टाकण्याचा प्रयत्न झाला. हट्ट धरतात. आधी महाराजांच्या गडकिल्ल्यावर अतिक्रमण सुरू केलं. आता तर धार्मिक स्थळाचा कब्जा घेण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. उद्या घरात देखील येतील, असं नितेश राणे म्हणालेत.

कर्नाटकमध्ये पाकिस्तान जिंदाबादचे नारे ऐकायला येतात. काँग्रेसचे खरे मनसुभे उघडे पडतात. त्यांना महत्वाची खाती देण्याची काँग्रेसची कमिटमेंट आहे. असाच प्रयत्न त्यांच्या धार्मिक स्थळावर झाला तर पूर्ण महाराष्ट्र आणि देश पेटला असता. हिंदू एकत्र येत नाहीत हे त्यांना माहीत आहे. हिंदू समाज झोपला आहे. ही शोकांतिका आहे, असंही नितेश राणे यांनी म्हटलं आहे.