मुंबई पारबंदर अर्थात एमटीएचएल प्रकल्प आर्थिक भरभराट आणणारा ठरेल. हा तिसऱ्या मुंबईची सामाजिक – आर्थिक परिस्थिती पालटून टाकणारा गेम चेंजर ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. तर महाराष्ट्राच्या ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचा मार्ग एमटीएचएलवरून जाईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मुंबई पारबंदर प्रकल्पांतर्गत या महत्त्वाकांक्षी समुद्री पुलाची मुख्य भूमीशी प्रत्यक्ष जोडणी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत समारंभपूर्वक करण्यात आली. या समारंभात ते बोलत होते.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे लोकार्पण या प्रकल्पाचे भूमिपूजन करणारे आणि पुढे हा प्रकल्प पूर्णत्वास जावा यासाठी सर्वतोपरी पाठबळ देणारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येईल, असे देखील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी सांगितले. यावेळी खासदार राहुल शेवाळे, नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, एमएमआरडीएचे आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास, जपानचे मुंबईतील वाणिज्यिक दूतावास प्रमुख डॉ. फुकाहोरी यासुकाटा, “जायका”च्या भारतातील प्रमुख इव्हा मोतो, प्रकल्प आकारास आणणारे एल अँड टी, देवू, आएएचाय चे अभियंते, तांत्रिक अधिकारी, कर्मचारी, मजूर आदी उपस्थित होते.
हा प्रकल्प पूर्णत्वास जात आहे याचा अतिशय आनंद होत आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाप्रमाणेच या प्रकल्पाचे भूमिपूजन आणि लोकार्पण यांचा योग जुळून येणार आहे. या दोन्ही प्रकल्पांचे भूमिपूजन श्री. फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कालावधीत झाले होते, आणि लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. हा प्रकल्प मुंबई, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील सामाजिक, आर्थिक परिस्थिती पालटून टाकणारा ठरणार आहे. हा समुद्री पूल साकारण्याचे मोठे आव्हान होते. पण ते एका सांघिक भावनेने पेलण्यात आले. हा पुल पुढे मुंबई- पुणे एक्स्प्रेस वे, आणि मुंबई -गोवा मार्गाला जोडण्यात येणार आहे. यामुळे तिसरी मुंबई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रदेशात शैक्षणिक, औद्योगिक आणि सेवा क्षेत्र यांचा विकास होणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
