महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या बारावी परीक्षेचा निकाल मागील आठवड्यात जाहीर झाला होता. त्यानंतर आता दहावीच्या परीक्षेचा निकाल कधी जाहीर होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ जूनच्या पहिल्या आठवड्यात म्हणजेच एक जून ते पाच जून दरम्यान निकाल जाहीर करण्याची शक्यता आहे. शिक्षण मंडळाच्या वतीने निकालाची तयारी पूर्ण झाली आहे.
बारावीच्या परीक्षेचा निकाल वेळेपूर्वीच जाहीर केला. दहावीच्या परीक्षेचाही निकाल वेळेपूर्वीच लावण्याची तयारी सुरू केली आहे. यामुळे हा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यातच जाहीर होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. दहावीच्या परीक्षा पूर्ण झाल्यानंतर राज्यात शिक्षकांचे जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी आंदोलन सुरू होते; तर काही संघटनांनी पेपर तपासणीवरही बहिष्कार टाकला होता. यामुळे काही दिवस पेपर तपासणीला उशीर होत होता; मात्र मंडळाने इतर सर्व यंत्रणा कामाला लावून दहावीच्या परीक्षेचे पेपर तपासणीचे कामही वेळेत पूर्ण केले असून आता केवळ निकाल जाहीर करण्यासाठी गुणांकन आणि त्यासाठीची जुळवाजुळव आदी तांत्रिक कामे शिल्लक राहिली आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि शिक्षण मंडळ तर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या लेखी परीक्षा या दोन ते पंचवीस मार्च या कालावधीत संपन्न झाल्या. यंदा दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी एकूण 15 लाख 77 हजार 256 मुलांनी नोंदणी केली होती. त्यामध्ये 8 लाख 44 हजार 116 मुले तर 7 लाख 33 हजार 67 मुलींचा समावेश होता. मात्र गेल्या पाच वर्षाच्या तुलनेत यंदा परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थी संख्या कमी झाल्याचे निदर्शनास आले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विद्यार्थी संख्या 61 हजार 708 विद्यार्थांनी कमी झाली आहे.
