औरंगाबादचे नाव छ.संभाजीनगर तसेच उस्मानाबाद शहरांचे नाव धाराशिव असे नवीन नामकरण नुकतेच पार पडले. मागील वर्षी महाराष्ट्र सरकारने औरंगाबाद शहराचे छत्रपती संभाजीनगर व उस्मानाबादचे धाराशिव असे नामांतर करण्यास मंजूरी दिली आहे. दरम्यान राज्यात आणखी एका शहराचे नाव बदलण्याच्या हालचाली वेग आला अहमदनगरचे नाव अहिल्यानगर व्हावे अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार राम शिंदे आणि गोपीचंद पडळकर यांनी केली.
अहमदनगरच्या चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 298 व्या जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं.या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,आमदार राम शिंदे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील,आमदार गोपीचंद पडळकर असे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. या कार्यक्रमात भाषण करताना राम शिंदे यांनी अहमदनगरचं नाव अहिल्यानगर करण्याची मागणी केली. गोपीचंद पडळकर यांनीदेखील याबाबत मागणी केली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात अहमदनगरचं नाव अहिल्यानंगर होणार, अशी मोठी घोषणा केली. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील याबाबत घोषणा केली. तसेच आपल्या सरकारच्या कार्यकाळात अहिल्यानगर नाव होणं हे आमचं भाग्य आहे,असं एकनाथ शिंदे म्हणाले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कि आपलं सरकार हे हिंदुत्ववादी सरकार आहे आपण छत्रपती शिवरायांचं नाव सांगणारे लोकं आहोत आपण तुमच्याच नेतृत्वात संभाजीनगर तयार केलंय, आपण धाराशिव तयार केलंय. आता तुमच्याच नेतृत्वात मुख्यमंत्री महोदय अहिल्यानगर झालं पाहिजे. मला विश्वास आहे, छत्रपतींचा मावळा मुख्यमंत्री आहे तर अहिल्यानगर होणारच. तुमच्या मनात शंका ठेवण्याचं कारण नाही असं मोठं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं.
लोकमाता अहिल्यादेवी होळकर नसत्या तर काशी राहिली नसती. त्या नसत्या तर शिवाची मंदिरं आपल्याला दिसली नसती. त्या नसत्या तर दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत आमचा धर्म आज जीवंत आहे, तो धर्म आज जीवंत नसता. अशा प्रकारचं कार्य या राजमातेने करुन दाखवलं. त्यामुळे जी मागणी होतेय की, या जिल्ह्याला अहिल्यानगर नाव दिलं पाहिजे, मी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत विनंती करणार आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले
