छत्रपती संभाजीनगरच्या पंतप्रधान आवास योजना घोटाळ्यात ईडीने तत्कालीन जिल्हाधिकारी तथा कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांना चौकशीसाठी नोटीस बजावली असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. या घरकुल योजनेत 1 हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप झाला होता. त्यानंतर ईडीने संभाजीनगरमध्ये तब्बल तेरा ठिकाणी छापे टाकले होते. यानंतर ईडीने महापालिका अधिकाऱ्यांची चौकशी केली, तत्कालीन महापालिका आयुक्तांची सुद्धा चौकशी केली होती आणि त्यानंतर आता तत्कालीन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना ईडीन चौकशीसाठी बोलावले असल्याची सूत्रांची माहिती आहे. सुनील चव्हाण सध्या कृषी आयुक्त म्हणून कार्यरत आहे.
घरकुल घोटाळा प्रकरणात ईडीने संभाजीनगरमध्ये तब्बल तेरा ठिकाणी छापे टाकले होते. यानंतर मनपा अधिकाऱ्यांची चौकशी केली. त्यानंतर आता तत्कालीन जिल्हाधिकारी तथा सध्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांना ईडीने चौकशीसाठी बोलावले असल्याची माहिती मिळत आहे.
महापालिकेने पंतप्रधान आवास योजनेंतर्गत सुमारे 39 हजार घरांचा ‘डीपीआर’ तयार करून निविदा प्रक्रिया पूर्ण केली. फेब्रुवारी 2022 मध्ये टेंडर निघाल्यानंतर समरथ मल्टिबीज इंडिया प्रा. लि., इंडग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिसेस व जग्वार ग्लाेबल सर्व्हिसेस या कंपन्यांनी एकाच ‘आयपी अॅड्रेस’वरून टेंडर भरले. यातून कोट्यवधींचा घोटाळा करण्याच्या ते तयारीत होते. या प्रक्रियेत कागदपत्रे सादर करताना पुण्याच्या न्याती कंपनीचे नाव जग्वार ग्लोबल सर्व्हिसेस कंपनीशी जोडण्यात आले. त्यामुळे मूळ न्याती कंपनीचे संचालक नितीन द्वारकादास न्याती, पीयूष नितीन न्याती, प्रवीण नितीन न्याती यांना अनुक्रमे 16, 17 आणि 18 क्रमांकाचे आरोपी करण्यात आले.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतील पंतप्रधान आवास योजनेच्या निविदेत तथाकथित घोटाळ्याप्रकरणी छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी तथा तत्कालीन महापालिका आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांची देखील यापूर्वी ईडीकडून चौकशी करण्यात आली. विशेष म्हणजे त्यापूर्वी महानगरपालिकेच्या उपायुक्त अपर्णा थेटे यांची देखील मुंबईच्या ईडी कार्यालयात चौकशी करण्यात आली होती. आता त्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी तथा सद्या कृषी आयुक्त असलेले सुनील चव्हाण यांना देखील याच प्रकरणी नोटीस देण्यात आली आहे. त्यामुळे आता प्रधानमंत्री आवास योजनेप्रकरणी चौकशी होणाऱ्या अधिकाऱ्यांची संख्या वाढत आहे.
