चौंडीतील वादावरून अजित पवारांचे कानावर हात; म्हणाले कुठला कार्यक्रम घेतला माहिती नाही

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त सकाळी साडेपाच वाजता शासकीय कार्यक्रमांना सुरुवात होणार होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मध्यरात्री जयंती उत्सवाला सुरुवात केली. रोहित पवार यांच्या या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. अशातच विरोधी पक्ष नेते आणि काका अजित पवार यांनी यांसदर्भात माहिती नसल्याचे सांगितले. त्यामुळे रोहित पवार यांनी वेगळी चूल मांडली अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

अजित पवार म्हणाले, ‘दरवर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम होतात. गेल्या वर्षी मी देखील त्या कार्यक्रमाला गेलो होतो. मात्र यावर्षीच्या कार्यक्रमाबद्दल मला काहीही माहिती नाही. यावर्षी तेथे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री उपस्थित राहत आहेत. रोहित तेथील लोक प्रतिनिधी आहे. त्येने तिथे कोणता कार्यक्रम घेताल त्याबद्दल मला काही माहिती नाही. कारण मी काल उशीरा पर्यंत राष्ट्रवादी भवनला होतो. त्यानंतर काही लोक भेटीला आले होते. त्यानंतर सीपीकार्यालयात गेलो आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या अर्धाकृती पुतळयाला अभिवादन करायचं ते झालं.’ असं म्हणत रोहित पवारांनी काल मध्यरात्री साजरी केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीवर अजित पवारांनी बोलणं टाळलं आहे.

आज होणाऱ्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, इंदूरच्या होळकर संस्थानांचे श्रीमंत राजे यशवंतराव होळकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यानिमित्त सकाळी पाच वाजता येथील महादेव मंदिरात जलाभिषेक करण्यात आला.राम शिंदे म्हणाले की, शासकीय जयंती सोहळ्याच्या पत्रिकेवर सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांची नावं आहेत. त्यामुळे पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्यासमोर नतमस्तक होणं यात गैर नाही पण प्रथा, परंपरा मोडणं वेगळ्या पद्धतीचा अवलंब करणं यावर विचार विनिमय झाला पाहिजे अशी प्रतिक्रिया राम शिंदे यांनी दिली.