मदरशाच्या नावाखाली मुलांची तस्करी, पोलिसांनी केली ५९ मुलांची सुटका; रेल्वेतून तस्करी

बिहारमधून महाराष्ट्रात लहान मुलांच्या संशयीत तस्करीचं एक मोठं प्रकरण उघडकीस आलं आहे. बिहारहून महाराष्ट्रात रेल्वेने प्रवास करत दाखल झालेल्या 30 अल्पवयीन मुलांना मनमाडमध्ये तर 29 लहान मुलांना जळगाव रेल्वे स्थानकावर सोडवण्यात आलं. त्यांच्यासोबत असलेल्या एकूण पाच जणांवर कलम 470 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या लहान मुलांना पुणे किंवा सांगलीतील मदरशात नेण्याचा प्लॅन होता, अशा संशय रेल्वे पोलिसांना आहे. यामधील काही मुलांची रवानगी नाशिकच्या उंटवाडी परिसरातील बालसुधार गृहात करण्यात आली आहे.

बिहार राज्यातून 59 मुलांना सांगली येथील मदरशामध्ये तस्करीसाठी घेऊन जात असल्याची माहिती रेल्वे पोलिसांना मिळाली. या तस्कारीचा कोणाला संशय येऊ नये म्हणून मुलांना मदरशाचा ड्रेस घालण्यात आला होता. बिहार राज्यातून पूर्णिया येथून लहान मुलांना दानापूर-पुणे एक्स्प्रेसने बाल तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती भुसावळ रेल्वे सुरक्षा बल, लोहमार्ग पोलीस भुसावळ यांना मिळाली. मग पोलिसांनी सापळा रचला.दानापूर पुणे ही गाडी भुसावळ स्थानकावर येताच कसून तपासणी करण्यात आली. यावेळी वेगवेगळ्या डब्यांमधून 8 ते 15 वयोगटातील 29 मुलांना रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकाने ताब्यात घेतले. तसेच मनमाड रेल्वे स्थानकावर 30 मुले साप़डली आहेत. या सर्व मुलांना रेल्वे स्थानकावर उतरवून त्यांच्यासोबत असणाऱ्या एका संशयीताला शिताफीने पकडून रेल्वे सुरक्षा बलाच्या पोलीस ठाण्यात आणण्यात आले.

चौकशीत मदरशाच्या नावाखाली पूर्णिया जिल्ह्य़ातून सांगलीत त्यांची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली. वैद्यकीय तपासणीनंतर बीएसएलमधून सुटका करण्यात आलेल्या २९ मुलांना चाइल्ड हेल्प डेस्कच्या एनजीओमार्फत जळगावला पाठवण्यात आले.चाइल्ड वेल्थ सेंटरच्या निर्देशानुसार बालगृह/जळगाव येथे सुटका करण्यात आलेली मुले सुपूर्द करण्यात आली.रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी चार संशयित आरोपींना अटक केली आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लहान मुलांची तस्करी होत असल्याची टीप पोलिसांना एका स्वयंसेवी संस्थेने दिली होती.मुलांची ओळख पटवल्यावर त्यांना त्यांच्या घरी पाठवण्यात येणार आहे.