भाजपाचे वरिष्ठ नेते आणि खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर आता पुणे लोकसभा मतदारसंघात येत्या काही दिवसांत पोटनिवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाने कर्नाटकातून तब्बल ४२०० ईव्हीएम मशीन्स पुण्यात आणले आहे. तसेच निवडणुकीच्या स्थितीबाबत पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती मागवली आहे. त्यामुळं येत्या दोन आठवड्यांत पुणे लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. परंतु आता निवडणूक जाहीर झालेली नसताना पुण्यातील जागेवरून महाविकास आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर आले आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुणे लोकसभेच्या जागेवर थेट दावा ठोकत ठाकरे गट आणि काँग्रेसवर जोरदार कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर काँग्रेससह ठाकरे गटानेही पुण्याच्या जागेवर दावा ठोकत राष्ट्रवादीला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
पुणे लोकसभेची पोटनिवडणूक लढवण्यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरु आहे. पुण्यात राष्ट्रवादीचे 40 तर काँग्रेसचे फक्त 10 नगरसेवक असल्याचा दावा अजित पवारांनी केला आहे. मात्र पुण्यात राष्ट्रवादीचे 40 नाही तर केवळ 13 नगरसेवक असल्याचं काँग्रेसने दाखवून दिले आहे. राष्ट्रवादीचे बहुतांश नगरसेवक पुणे लोकसभा मतदारसंघाचा भाग नसलेल्या हडपसर आणि वडगाव शेरी मतदारसंघातील असल्याचं काँग्रेसने दाखवून दिले आहे. यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीत जागावाटपावरुन ताण वाढण्याची शक्यता आहे.
कॉंग्रेसच्या दाव्यानुसार पुणे लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघातील मतांची बेरीज केल्यास कॉंग्रेसच्या मतांची आकडेवारी राष्ट्रवादीच्या मतांपेक्षा जास्त आहे . त्यामुळे पुण्याची जागा आपणच कायम ठेवणार असल्याच कॉंग्रेसने म्हटले आहे. पुणे लोकसभेमध्ये सहा विधानसभा मतदारसंघ यापैकी दोन विधानसभा मतदारसंघ हे राष्ट्रवादीकडे त्यापैकी वडगाव शेरी येथे सुनील टिंगरे हे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार आहे त्यांना 97, 708 मते मिळाली तर पर्वती विधानसभा मतदारसंघात अश्विनी कदम यांना दुसऱ्या क्रमांकाची 60, 225 मते मिळाली होती अशी एकूण 1, 57,953 मते राष्ट्रवादीला मिळाली होती.
असं असलं तरीही मागील अनेक वर्षांपासून पुणे लोकसभेची जागा कॉंग्रेसकडे आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडून ही जागा कॉंग्रेसलाच दिली जाणार असल्याचं बोललं जात आहे. महाविकास आघाडीत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या दाव्याने नव्याने चर्चा सुरु झाली आहे. पुणे शहरात माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांच्यानंतर भाजपच्या गडाला सुरुंग लावेल असा एकही नेता काँग्रेसकडे नाहीय. विश्वजित कदम, मोहन जोशी, रमेश बागवे किंवा अरविंद शिंदे यांना पुण्याचं मैदान मारता आलेलं नाही. पुणे शहरात राष्ट्रवादीचे तीन आमदार आहेत. त्यामुळंच अजित पवार यांनी आमदारांच्या शक्तीच्या बळावर पुण्याच्या जागेवर दावा ठोकला आहे.
