किनारी रस्ता प्रकल्प मुंबईकरांसाठी दिलासा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई किनारी रस्ते प्रकल्पातील बोगदे खणनाचा टप्पा मावळा-टीबीएम यंत्राने पूर्ण केला आहे. या प्रकल्पामुळे मुंबईकरांचा प्रवास आरोग्यदायी, आरामदायी आणि वाहतूक कोंडीमुक्त होईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे व्यक्त केला. या प्रकल्पामुळे मुंबईच्या पायाभूत सुविधांमध्ये एक महत्त्वपूर्ण अशी भर पडल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मुंबई किनारी रस्ता प्रकल्पातील स्वराज्यभूमी-गिरगाव चौपाटी ते प्रियदर्शनी पार्क दरम्यानचा बोगदा खणण्याचा अखेरचा टप्पा- ब्रेक थ्रू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी मुंबई महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त डॉ. आय. एस. चहल, अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, एल ॲण्ड टी कंपनी तसेच या प्रकल्पातील सल्लागार कंपन्यांचे अभियंते, अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते. प्रियदर्शनी पार्क येथे टीबीएम यंत्राने खोदाईचा हा अखेरचा टप्पा पूर्ण करून बोगदा पूर्ण करताच, या ठिकाणी काम करणाऱ्या अभियंते, अधिकारी, कर्मचारी-कामगारांनी एकच जल्लोष केला.

यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की, मुंबईसाठी हा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. देशातील अशा प्रकारचा पहिलाच बोगदा आपण पूर्ण केला आहे. हा प्रकल्प आणि त्यातील बोगदा पूर्ण करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरत आहोत. समुद्राखालून जाणाऱ्या रस्त्यांसाठी विविध सुविधाही अत्याधुनिक असतील. या प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी आपण स्थानिक कोळीवाड्यातील भूमिपुत्रांनाही विश्वासात घेतले आहे. समुद्रातील दोन खांबामधील अंतरही त्यादृष्टीने १२० मीटरचे केले आहे. सर्वांना सोबत घेऊन हा प्रकल्प पुढे नेला आहे. पर्यावरणीय अशा सर्व गोष्टींची काळजी घेतली आहे. मुंबईत असे महत्त्वाचे अनेक प्रकल्प सुरु आहेत. त्यांना केंद्राकडून विशेषतः प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आवर्जून पाठबळ दिले आहे. मुंबई ही आंतरराष्ट्रीय नगरी आहे. देशाची आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे मुंबईची वाहतूक कोंडीतून मुक्तता व्हावी, नागरिकांना दिलासा मिळेल, यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

एमटीएचएल हा समुद्री सेतूही आता पूर्ण होतो आहे. हा मार्ग पुढे वरळीला जोडण्यात येणार आहे. त्यामुळे पश्चिम महामार्गावरील ताण कमी होणार आहे. मेट्रोचे विविध मार्ग, उड्डाणपूल यांचे काम पूर्ण होण्यामुळे पश्चिम उपनगरातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे.असंही एकनाथ शिंदे म्हणाले.