कोकणवासीयांना सुविधाजनक ठरणारी मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेसचं शनिवारी (३ जून) रोजी होणारा लोकार्पण सोहळा रद्द करण्यात आला आहे. ओडिशामध्ये झालेल्या भीषण रेल्वे अपघातामुळे वंदे भारत एक्स्प्रेसचं लोकार्पण रद्द करण्यात आलं आहे. ‘वंदे भारत एक्स्प्रेस’चा उद्घाटन कार्यक्रम मडगाव येथे पडणार होता. उद्या होणाऱ्या कार्यक्रमासाठीची तयारी पूर्ण झाली होती. मात्र, अपघातामुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गोव्याची पहिली वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार होता. मुंबई-मडगाव ही भारतातील 19 वी वंदे भारत एक्स्प्रेस आहे. मुंबई ते मडगाव हे अंतर वंदे भारत एक्स्प्रेस सात तास 50 मिनिटात पूर्ण करणार आहे. मडगाव-मुंबई सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेस कोकणवासियांना मोठा दिलासा देणारी ठरणार आहे. ही वंदे भारत एक्सप्रेस आठवड्याला सहा दिवस चालवण्याचं सध्या प्लॅनिंग आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मडगाव, थिविम, कणकवली, रत्नागिरी, खेड, पनवेल, ठाणे, दादर, सीएसएमटी या स्थानकांवर वंदे भारत ट्रेन थांबेल. सध्या दिलेल्या प्रस्तावानुसार, सीएसएमटी वरून सकाळी 5.35 ला ट्रेन सुटेल, तर मडगाव येथे दुपारी 1.15 वाजता वंदे भारत ट्रेन पोहोचेल. त्यानंतर लगेच मडगाव वरुन तीच वंदे भारत दुपारी 2.35 वाजता मुंबईकडे रवाना होईल आणि रात्री 10.25 वाजता ट्रेन मुंबई सीएसएमटीला पोहोचेल. वंदे भारत एक्सप्रेस ही कोकण मार्गावर धावणारी सर्वात जलद एक्सप्रेस असणार आहे. तेजस एक्सप्रेसपेक्षा देखील एक तास लवकर ही ट्रेन मडगावला पोहोचेल, त्यामुळे या ट्रेनला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे.
