मविआत जागावाटपाबाबत २०१९ चे निकाल हा आधार होऊ शकत नाही; काँग्रेस नेत्यांची भूमिका

महाविकास आघाडीत जागावाटपवरून रस्सीखेच सुरू आहे. ताब्यात असलेल्या जागांच्या संख्येनुसार वाटप जागांच्या वाटपाचा विचार केला जाईल, असा सूर राष्ट्रवादी काँग्रेसचा होता. त्यानुसार काही दिवसांपूर्वी ‘मोठा भाऊ कोण’ यावरून चांगलीच चर्चा झडली होती. आता राष्ट्रवादी काँग्रेसने जागावाटपांच्या पार्श्वभूमीवर लोकसभा मतदारसंघनिहाय पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. त्यानंतर आता काँग्रेसकडूनही पक्षाच्या ताकदीचा आढावा घेणे सुरू आहे.

या बैठकीत काँग्रेसच्या नेत्यांनी आगामी लोकसभा निवडणुकांसाठी महाविकास आघाडीच्या जागावाटपात २०१९ चे निकाल हा आधार होऊ शकत नाही. तसे निकष देखील नाहीत, अशी स्पष्ट भूमिका काँग्रेसच्या नेत्यांनी मांडली. एखाद्या निवडणुकीत कमी जागा मिळाल्या म्हणजे पाच वर्षानंतर संबंधित पक्षाची परिस्थिती तशीच राहत नाही. त्यामुळे पक्षसंघटन आणि स्थानिक परिस्थिती पाहूनच जागावाटप व्हावे, असा सूर या काँग्रेस नेत्यांनी एकमताने आळवला आहे.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही २०१९ चे निकाल हा जागावाटपाचा निकष होऊ शकत नाही, असे स्पष्ट केले. ते म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर काँग्रेसची आघाडी आधीपासून आहे. पण आता या आघाडीत शिवसेनाही आहे. त्यामुळे निवडणुकीत स्थानिक पातळीवर समन्वय राहणे महत्त्वाचे आहे. २०१९ ची परिस्थिती व आत्ताची परिस्थिती यात फरक आहे. एखाद्या निवडणुकीत जागा कमी जिंकल्या म्हणजे तीच परिस्थिती कायम राहत नसते.”सर्व बाजूंचा विचार करून निर्णय घेतला जाईल असंही यावेळी अशोक चव्हाण म्हणाले.