ठाण्यातील क्लस्टर योजनेच्या अंमलबजावणीला सुरूवात; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार प्रकल्पाचा शुभारंभ

देशातीलच नव्हे तर आशिया खंडातील सर्वात मोठ्या, महत्वाकांक्षी आणि ऐतिहासिक समुह विकास योजना सत्यात उतरणार असून असून या महत्वपूर्ण प्रकल्पाचा शुभारंभ सोहळा येत्या सोमवारी म्हणजे 5 जून रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे

ठाणे शहरात मोडकळीस आलेल्या धोकादायक अनधिकृत आणि अधिकृत इमारतींचा सुनियोजित तसंच संपूर्ण नागरी पायाभूत सुविधांसह पुनर्विकास व्हावा यासाठी एकूण 45 नागरी पुनरुत्थान आराखडे तयार करण्यात आले असून त्याचं एकूण क्षेत्रफळ 1500 हेक्टर इतकं आहे. या 45 आराखड्यापैंकी अत्यंत दाटीवाटीचं क्षेत्र असलेल्या किसननगर नागरी पुर्नरुत्थान आराखडा क्र. 12 मधील नागरी पुर्नरुत्थान योजना क्र. 1 आणि 2 च्या कामाचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. अनधिकृत तसंच अधिकृत धोकादायक इमारतीचा सामूहिक पुर्नविकास करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून नियमावली तयार करण्यात आली आहे. या योजनेच्या कामाची सुरूवात अंतिम भूखंड क्र. 186/187 या वरील 7753 चौ.मी क्षेत्रफळावरील भूखंडावर त्याचप्रमाणे रस्ता क्रमांक 22 लगतचा भूखंड क्रमांक एफ – 3 या ठिकाणी 19275 चौ.मी. एवढया जागेवर करण्यात येणार आहे. नागरी पुनरुत्थान 1 व 2 ची अंमलबजावणी सिडको या शासनाच्या कंपनीमार्फत होणार आहे. त्याचप्रमाणे समूह विकास योजनेचं कामकाज सांभाळण्यासाठी कशिश पार्क इथं क्लस्टर पुनर्विकासचे कार्यालय निर्माण करण्यात आलं आहे. या प्रशस्त कार्यालयाचे उद्घाटनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

अनधिकृत इमारतीसह वसाहतीच्या टाऊनशीप धर्तीवर एकत्रित पुनर्विकासाचा प्रकल्प, मोडकळीस आलेल्या घरातून थेट सुरक्षित व सुनियोजित संकुलामध्ये घर, पात्र निवासी लाभधारकास विनामूल्य ३२३ चौ. फूट मालकी हक्काचे घर, प्रत्येक सेक्टरमध्ये सण, उत्सव, धार्मिक कार्यक्रम सामाजिक उपक्रमांसाठी विशेष जागा, प्रत्येक सेक्टरमध्ये वाचनालय, व्यायामशाळा, आरोग्य केंद्र आणि कम्युनिटी सेंटरची व्यवस्था, पाळणाघरासह महिला सक्षमीकरण केंद्र आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, अरुंद रस्ते आणि गजबजलेल्या गल्लीऐवजी प्रशस्त व दर्जेदार रस्ते आणि वाहतूक सुविधा, पाणीपुरवठा, मल व जलनिःस्सारण, घनकचरा व्यवस्थापनासह पायाभूत सुविधा, पुनर्विकसित टाऊनशीप आराखड्यामध्ये सुसज्ज आरोग्य, शैक्षणिक, क्रीडा, मनोरंजन, उद्यान पार्किंग, मंडई आदि नागरी सुविधांचा समावेश या योजनेत आहे. प्रख्यात वास्तुविशारद हाफिज कॉन्ट्रॅक्टर यांच्या डिझाईननुसार टाऊनशीपची उभारणी केली जाणार आहे.