मी धमकीची चिंता करत नाही; धमक्या देऊन कुणी आवाज बंद करु शकत नाही – शरद पवार

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्यानंतर महाराष्ट्रात खळबळ माजली. तुझा लवकरच दाभोळकर होणार, अशी धमकी या फेसबुक पेजवरून देण्यात आली. त्यानंतर राज्यातील वातावरण तापले असून या धमकीनंतर शरद पवार यांची पहिल्यांदाचा प्रतिक्रिया आली आहे. ‘ मी धमकीची चिंता करत नाही, धमक्यांना घाबरत नाही. ज्यांच्याकडे जबाबदारीची ही सूत्रं आहेत, त्यांना जबाबदारी टाळता येणार नाही,’ असे शरद पवार म्हणाले.

पुढे बोलताना ते म्हणाले की, कोणत्याही प्रश्नावर मत देण्याचा अधिकार या जनतेच्या प्रत्येक नागरिकाला आहे आणि असं असताना धमक्या देऊन आवाज कोणाचा बंद करू शकेल असं कोणाला वाटत असेल तर त्यांचा हा गैरसमज आहे.“महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्था सांभळणाऱ्या पोलीस दलाच्या कर्तुत्वावर माझा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे त्याची चिंता मी करत नाही. ज्यांच्या हातात राज्याची सूत्रं आहेत त्यांना आपली जबाबदारी टाळता येणार नाही,” असंही शरद पवारांनी नमूद केलं.

शरद पवार यांना ट्विटरवरुन आलेल्या धमकीची सरकारने गंभीर दखल घेतली असून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी मी स्वतः बोललो आहे, तपासाच्या सूचना दिल्या आहेत, असे ट्वीट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेय. शरद पवार हे ज्येष्ठ नेते असून, त्यांच्याबदल आम्हा सर्वांनाच आदर आहे. त्यांच्या सुरक्षेची संपूर्ण काळजी घेतली जाईल. आवश्यकता असल्यास सुरक्षा व्यवस्थेत वाढही करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत, असेही शिंदे म्हणाले.आपल्या राजकारणासाठी महाराष्ट्रातली कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचे कारस्थान हाणून पाडले जाईल, असे एकनाथ शिंदे म्हणाले.