कालचा आतंकग्रस्त काश्मीर आता विकास पथावर – खासदार डॉ.अनिल बोंडे

कालचा आतंकग्रस्त कश्मीर आता विकास पथावर आहे, हीच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची खरी ताकद आहे. उद्याच्या पिढ्यांना उज्वल भविष्य द्यायचं असेल तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हेच देशाला एकमेव पर्याय आहेत, अशी स्पष्टोक्ती राज्यसभेचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी दिली. स्थानिक यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालय वानाडोंगरी येथे मोदी @9 महा जनसंपर्क अभियानांतर्गत प्रबुद्ध नागरीक संमेलन गुरुवारी आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. रामटेक लोकसभा प्रभारी आमदार संजय केळकर, भाजपा जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये, संघटनमंत्री किशोर रेवतकर, महामंत्री अजय बोढारे यांच्यासह अन्य उपस्थित होते.

दरम्यान डॉ.बोंडे पुढे बोलताना म्हणाले, 2014 नंतर देशात अभूतपूर्व परिवर्तन घडून आले. देशातील सर्व घटकांसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी योजना कार्यान्वित केल्या आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी झाल्याने देशभरातील नागरिकांना त्याचा मोठा लाभ मिळत आहे. आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून रुग्णांना चांगले उपचार मिळत आहेत. गरिबांच्या तब्येतीची काळजी घेतली जात आहे. विविध दुर्धर आजारांवर मोफत शस्त्रक्रिया केली जात आहे. उज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून मोफत गॅस कनेक्शन घरोघरी देण्यात आले. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून नागरिकांना घर बांधून देण्यात आली.

दळणवळणाच्या सुविधेमुळे व्यापाराला मोठ्याप्रमाणात चालना मिळत आहे. यासह देशातील धार्मिक स्थळांचा विकास सुद्धा नरेंद्र मोदी सरकार द्वारे करण्यात आला असल्याचे डॉ.अनिल बोंडे म्हणाले. काशी विश्वनाथ, मथुरा, उज्जैन, श्रीकृष्ण जन्मभूमी, राम जन्मभूमी इत्यादीचे निर्माण करून देशाचा सांस्कृतिक वारसा जपला. 70 वर्षात जे परिवर्तन होऊ शकले नाही तो नऊ वर्षात बदल देशात झाला आहे. नरेंद्र मोदी यांच्या योजनांच्या केंद्रस्थानी हा देशातील गोरगरीब शेतकरी नागरिक आहेत. पीएम किसान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट 2 लाख 40 हजार कोटी रुपये पाठवण्यात आले. 52 एम्स निर्माण करण्यात आले. हा बदल लक्षणीय आहे. त्यामुळे मोदीजींच्या नेतृत्वावर नागरिकांना विश्वास आहे. कोरोना महामारीमध्ये पीपीई किट, मोफत लस, अन्नधान्य यासह विविध सोईसुविधा नागरिकांना देण्यात आल्याचे ते म्हणाले.

आ.केळकर गरीबी हटाव असा नारा विरोधकांनी दिला. मात्र प्रत्यक्षात ती हटली नाही. विरोधकांनी स्वतःची पोट भरली. त्यामुळे ही दरी वाढत गेल्याने 2014 पूर्वी देशात शंभर पेक्षा अधिक घोटाळे झाले. मात्र नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार हे बेदाग सरकार आहे. सुशासन, गरीब कल्याणाचे सरकार देशातील प्रत्येक घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करत असल्याचे प्रतिपादन यावेळी आमदार संजय केळकर यांनी केले. देशात होत असलेल्या अभूतपूर्व विकास कामांचे श्रेय नरेंद्र मोदी यांनी स्वतः न घेता जनतेला दिले आहे, असेही त्यांनी सांगितले.