धमकी देणे आमच्या रक्तात नाही; धमकी देणाऱ्याला तत्काळ अटक व्हावी – चंद्रशेखर बावनकुळे

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ट्विटरच्या माध्यमातून त्यांना दिलेल्या धमकीची तक्रार खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबईच्या पोलिस आयुक्तांकडे केली आहे. अशा प्रकारची धमकी देणाऱ्या विरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे, असे मत भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले आहे. या संदर्भात ते माध्यमांशी बोलत होते.

पवार यांच्यासारख्या व्यक्तीला धमकी देणाऱ्याला तत्काळ अटक करून तुरुंगात टाकले पाहिजे. पवारांसारख्या वरिष्ठ नेतृत्वाला धमकी देणे योग्य नाही. राज्य सरकारकडून योग्य कारवाई करण्यात यावी, असे बावनकुळे म्हणाले. शुक्रवारी ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ‘धमकी देणे हे आमच्या रक्तात नाही, ज्याने कोणी धमकी दिली असेल त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. तो राष्ट्रवादीचा असो, भाजपचा असो किंवा काँग्रेसचा असो, त्याच्यावर कारवाई व्हायला हवी.’

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी मेळाव्यावरही चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसींचा नंबर एकचा शत्रू आहे. भुजबळ सोडले तर राष्ट्रवादीत ओबीसी नेत्यांना संधी नाही. नागपूरच्या शिबिरात ठराव करुन महाराष्ट्राचे किंवा राष्ट्रीय अध्यक्षपद ओबीसीला देतील, अशी अपेक्षा होती. त्यांच्या सरकारमध्ये ओबीसीला काही मिळालं नाही.