केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपने देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. महाराष्ट्रातही 30 जूनपर्यंत भाजपने विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज भाजपची नांदेडमध्ये सभा होत आहे. या सभेला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार आहेत. तसेच भाजपच्या नेत्या पंकजा मुंडेही या सभेला संबोधित करणार आहेत. पंकजा मुंडे या भाजपमध्ये नाराज असल्याची चर्चा होती. त्यांनी काही धक्कादायक विधानंही केली होती. त्यामुळे या नाराजीच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे आणि अमित शाह पहिल्यांदाच एका मंचावर येत असल्याने आजच्या नांदेडमधील सभेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
नांदेडमध्ये भाजपच्या महिनाभर चालणाऱ्या कार्यक्रमांची सुरुवात शहा यांच्या रॅलीने होणार आहे. यासोबतच मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल ते कार्यकर्त्यांच्या बैठकाही घेणार आहेत.नांदेड हा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा बालेकिल्ला मानला जातो. गुरु गोविंद सिंग यांनी त्यांच्या आयुष्याचा शेवटचा काळ नांदेडमध्ये घालवला होता, त्यामुळे हे ठिकाण शीखांसाठीही खास आहे. अमित शाह नांदेड येथे गुरुद्वारा समितीच्या सदस्यांचीही बैठक घेणार आहेत.
आज संध्याकाळी 6 वाजता नांदेडच्या तख्त सचखंड श्री हजूर अबचलनगर साहेब येथे जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. या सभेला भाजपचे नेते अमित शाह संबोधित करणार आहेत. पंकजा मुंडेही या सभेला येणार आहे. या सभेला 40 हजार लोक उपस्थित राहतील, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. त्यामुळे या सभेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
