मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा १४ जून रोजी वाढदिवस असतो. आपल्या लाडक्या नेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी राज्यभरातून मनसैनिक मुंबईत येत असतात. यावेळी कार्यकर्त्यांकडून पुष्पगुच्छ आणि हारतुरे देत राज यांचं अभिष्टचिंतन केलं जातं. मात्र यंदाच्या वाढदिवसानिमित्त राज यांनी एक पत्रक काढत आपल्या कार्यकर्त्यांना खास आवाहन केलं आहे. ‘शुभेच्छा देण्यासाठी येताना पुष्पगुच्छ, मिठाई अथवा कोणतीही भेटवस्तू आणू नका. तुम्हाला अगदीच काही आणावंसं वाटत असेल तर येताना झाडाचं रोप किंवा शैक्षणिक साहित्य मग त्या वह्या असतील किंवा तसंच एखादं छोटंसं शैक्षणिक साहित्य आणा,’ अशा सूचना राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.
राज ठाकरे आपल्या पत्रात म्हणाले, दरवर्षी राज ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने मला भेटायला, शुभेच्छा द्यायला येतात. त्यावेळी तुमची होणारी भेट, तुमच्याकडून मिळणाऱ्या शुभेच्छा हीच माझ्यासाठी तुमच्याकडून मिळणारी मोठी भेट असते. पण तरीही महाराष्ट्र सैनिक येताना पुष्पगुच्छ, मिठाई आणि भेटवस्तू घेऊन येतात. पण या वर्षीपासून माझा तुम्हाला मनापासून विनंती आहे की, कृपया पुष्पगुच्छ, मिठाई अथवा कोणतीही भेटवस्तू आणू नका. तुम्हाला अगदीच काही आणावंसं वाटत असेल तर येताना झाडाचं रोप किंवा शैक्षणिक साहित्य मग त्या वह्या असतील किंवा तसंच एखादं छोटंसं शैक्षणिक साहित्य आणा. तुम्ही दिलेली झाडांची रोपं आपण विविध संस्थांना वृक्षारोपणासाठी देऊ आणि जे काही शैक्षणिक साहित्य भेटवस्तू म्हणून आणाल ते गरजू विद्यार्थ्यांना आपल्या पक्षाकडून भेट म्हणून देऊ. तुम्ही माझ्या ह्या विनंतीचा नक्की मान ठेवाल ह्याची मला खात्री आहे.
राज ठाकरे यांनी आपल्या पत्रकातून मनसे कार्यकर्त्यांना पुष्पगुच्छ न आणण्याचं आवाहन करत असतानाच वाढदिवशी भेटीसाठी कोणत्या वेळेत उपलब्ध असणार, हेदेखील सांगितलं आहे. ‘मी आपल्या भेटीसाठी १४ जून रोजी सकाळी ८:३० ते १२:०० या वेळेत उपस्थित असेन, तेव्हा भेटूया १४ जूनला,’ असं ते म्हणाले.
