पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 70 हजार तरुणांना जॉइनिंग लेटरचे वाटप करण्यात आले. या तरुणांना शासनाच्या विविध खात्यांमध्ये नोकऱ्या देण्यात आल्या आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी 10:30 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुमारे 70,000 नवनियुक्त नोकरदारांना जॉइनिंग लेटर दिले. देशात 43 ठिकाणी आयोजित रोजगार मेळाव्याअंतर्गत ही जॉइनिंग लेटर वितरित करण्यात आली आहेत. रोजगार मेळा हा केंद्र सरकारचा एक विशेष उपक्रम आहे, ज्या अंतर्गत जॉइनिंग लेटर कोणत्याही अडचणीशिवाय दिली जातात.आगामी काळात रोजगार उपलब्ध करून देण्यात रोजगार मेळावा महत्त्वाची भूमिका बजावेल, अशी सरकारला आशा आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या वर्षी 22 ऑक्टोबर रोजी सुमारे 10 लाख तरुणांना सरकारी नोकऱ्या देण्यासाठी मोहीम सुरू केली होती. आतापर्यंत अनेक टप्प्यांत तरुणांना सरकारी नोकऱ्यांसाठी नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत. 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकार ही मोहीम पूर्ण करेल आणि निवडणुकीतील आपल्या अजेंड्यामध्ये ठामपणे मुद्दा मांडेल, असा अंदाज वर्तवला जात आहे.केंद्र सरकारच्या विभागांव्यतिरिक्त राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशातील विविध विभाग आणि संस्थांमध्ये रोजगार मेळाव्याअंतर्गत भरती केली जात आहे. ज्यासाठी देशभरातून नवनियुक्त कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. रोजगार मेळावा हे पंतप्रधान मोदींचे रोजगार वाढविण्यास प्राधान्य देण्याच्या दिशेनं एक मोठं पाऊल असल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान, मोदी सरकारला गेल्या महिन्यात 9 वर्ष पूर्ण झाली आहेत. या वर्षांत विरोधी पक्षांनी रोजगाराच्या मुद्द्यावर मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे, भाजप नेत्यांचा विश्वास आहे की, 10 लाख नोकऱ्यांचं वाटप केल्यानंतर ते विरोधकांच्या आरोपांना ठामपणे उत्तर देण्यास सक्षम होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, रोजगार मेळावा ही भाजप आणि एनडीए सरकारची वेगळी ओळख बनली आहे. त्याचबरोबर अनेक राज्यांमध्ये रोजगार मेळाव्याअंतर्गत नियुक्तीपत्रे दिली जात आहेत.
