राष्ट्रात मोदी महाराष्ट्रात शिंदे’ अशा मथळ्याखाली शिवसेनेच्या शिंदे गटाने मंगळवारी एक जाहिरात प्रसिद्ध केली होती. या जाहिरातीमुळे राजकारणात मोठा वादंग निर्माण झाला असतानाच आज शिंदे गटाने आणखी एक जाहिरात प्रसिद्ध केली आहे. कालच्या जाहिरातीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो होता. यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो नव्हता. त्यामुळे भाजप नेत्यांसह कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. यामुळे भाजप-शिंदे गटात मतभेद असल्याची चर्चा सुरु आहे. यावर आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. आमच्यात मतभेद असतील पण मनभेद नाहीत, असं बावनकुळे म्हणाले.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, कार्यकर्त्यांच्या मनाविरुद्ध होत त्यावेळी कार्यकर्ते विरोधातही प्रतिक्रिया देत असतात. भाजपमधील काही कर्यकर्त्यांची मनं तुटली आहेत, देवेंद्रजी यांनी पाच वर्ष मुख्यमंत्रीपदी होते त्यावेळी त्यांनी पक्षवाढीसाठी काम केलं, त्यामुळे कार्य़कर्ते चिडले आहेत. काल दिलेली जाहिरात हि कोणी दिली हे अद्याप समोर आलेलं नाही. देवेंद्र फडणवीस यांची तुलना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी करणे बरोबर नसल्याने कर्यकर्त्यांनी अशा प्रतिक्रिया दिल्याचे बावनकुळे म्हणाले.ते पुढे बोलताना म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इतक्या छोट्या मनाचे नाहीत त्यामुळे ते असं करणार नाहीत. शिंदे-फडणवीस सरकार चांगले काम करत आहे. यात मिठाचा खडा कोण टाकतं आहे हे पाहणार आहे. मी देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन याबाबत चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शिंदे गटाकडून आज पुन्हा जाहिरात छापण्यात आली आहे. यावर बोलताना बावनकुळे म्हणाले आज त्यांनी चांगल्या भावनेने दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला आहे.काल आलेल्या जाहिरातीत कोणीतरी खोडसाळपणा केला होता.आज तो दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला ही आमच्यासाठी आणि युतीसाठी चांगली गोष्ट आहे. आमच्याकडून चूक झाली तर आम्ही दुरुस्त करणार त्यांच्याकडून चूक झाली तर ते दुरुस्त करणार. कोणीतरी छोटं व्हाव कुणीतरी मोठं व्हावं. आमच्यात मतभेद असतील पण मनभेद नाहीत, असंही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमचं नेतृत्व करत आहेत. आम्ही त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला आहे.एकनाथ शिंदे सगळ्याच आमदारांना मदत करत आहेत. केंद्रीय नेतृत्वाने ही त्यांच्यावर विश्वास ठेवला आहे.आम्हाला त्यांचा पक्ष सांभाळण्याची गरज नाही, शिंदे त्यांचा पक्ष व्यवस्थित सांभाळत असल्याचे बावनकुळे म्हणाले.
