कर्नाटकमध्ये सत्तेत येऊन एका महिन्याहून कमी कालावधी झालेला असतानाच काँग्रेसने भारतीय जनता पार्टीच्या सरकारने घेतलेले निर्णय रद्द करण्यास सुरुवात केली आहे. मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये भाजपाने लागू केलेला धर्मांतरण विरोधी कायदा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक हेडगेवार तसेच स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील धडे पाठ्यपुस्तकातून वगळण्याचा निर्णय घेतला आहे. याच निर्णयावरुन नवीन वाद सुरु झालेला असतानाच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकासआघाडीवर निशाणा साधला आहे. तसेच फडणवीस यांनी थेट उद्धव ठाकरेंचा उल्लेख करत त्यांना एक सवाल विचारला आहे.
कर्नाटकमध्ये हेडगेवार आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा धडा पाठ्यपुस्तकांमधून वगळण्यात आला आहे. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपली प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी कॉंग्रेस आणि महाविकास आघाडीसह उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. पाठ्यपुस्तकांमधून हेडगेवार आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा धडा वगळण्यात आल्याच्या मुद्द्यावर फडणवीस म्हणाले की, पाठ्यपुस्तकांमधून एखादा धडा तुम्ही काढू शकता. पण लोकांच्या मनातील सावरकर आणि हेडगेवार तुम्ही काढू शकत नाही. तुम्ही एकही स्वातंत्र्या सेनानी लोकांच्या मनातून काढू शकत नाही.
मुंबईमधील गोरेगाव येथील एका कार्यक्रमामध्ये उपस्थित राहिल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटक सरकार घेतलेल्या निर्णयावरुन निशाणा साधला. “एखादा धडा तुम्ही वगळू शकता पण लोकांच्या मनातून तुम्ही स्वातंत्र्यवीर सावरकर काढू शकत नाही, हेडगेवार काढू शकत नाही. एकही स्वातंत्र्यसेनानी हा लोकांच्या मनातून काढू शकत नाही. काँग्रेस सरकार आल्यानंतर वेगळं काहीच अपेक्षित नाही. केवळ अल्पसंख्यांकांचं लांगूलचालन करण्यासाठी अशाप्रकारचे निर्णय कर्नाटकचं सरकार घेत आहे. माझा महाविकास आघाडी सरकारला सवाल आहे तुम्ही जे सांगताय महाराष्ट्रात कर्नाटक पॅटर्न आणणार तो हाच पॅटर्न आहे का? असा प्रश्न फडणवीस यांनी राज्यातील विरोधी पक्षात असलेल्या महाविकासआघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाला विचारला आहे.
त्याचबरोबर माझा सवाल उद्धव ठाकरे यांना देखील आहे की, आता तुमची प्रतिक्रिया काय आहे? कारण ज्यांच्या मांडिला- मांडी लावून तुम्ही बसलात त्यांनी जर अशा प्रकारे स्वातंत्र्यावीर सावरकरांचं नाव पुसायला निघाले आहेत. ते धर्मांतरणाला पूर्णपणे समर्थन द्यायला निघाले आहेत. त्यावर तुमचं मत काय? हे देखील तुम्ही सांगितलं पाहिजे. तुम्ही सत्तेसाठी तुम्ही हा समझोता केला हे यातून स्पष्ट होत आहे. पण अशा प्रकारे कोणतेही निर्णय घेतले तरी ते कुणाचंही नाव जनतेच्या मानस पटलावरून पुसू शकणार नाहीत.
