शिवसेना’ हा विचार आज वैयक्तिक महत्त्वाकांक्षेसाठी भरकटवला – राज ठाकरे

शिवसेना पक्षात मोठी फूट पडल्यानंतर शिंदे आणि ठाकरे असे दोन गट निर्माण झाले आहेत दोन्हीही गटांकडून आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा करण्यात येतोय त्यामुळे शिवसेनेचा दसरा मेळावा असेल किंवा शिवसेनेचा वर्धापन दिन दोन्ही गटांकडून मोठ्या जल्लोषात हा उत्सव साजरा करण्यात येतो. निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला धनुष्यबाण चिन्ह आणि पक्षाचं अधिकृत नावही दिलं आहे तर उद्धव ठाकरेंना मशाल हे चिन्ह देण्यात आले आहे

सोमवारी राज्याच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदा शिवसेना पक्षाचे दोन वेगवेगळे वर्धापन दिनाचे सोहळे साजरे करण्यात आले. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचा सोहळा हा गोरेगावमधील नेस्को येथे पार पडला. तर दरवर्षीप्रमाणे ठाकरे गटाने शिवसेना वर्धापनज दिन सोहळा षण्मुखानंद हॉलमध्ये पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोघांनीही एकमेकांवर जोरदार टीका केली. ज्यामुळे हा कार्यक्रम पक्षाचा वर्धापन दिन कमी आणि एकमेकांना टीका करून आपल्या पेक्षा कमी कसे दाखवता येईल, हे सांगण्यात गेले.

शिवसेना पक्षामध्ये अनेक दिग्गज नेते होते. अनेकांनी तर आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात देखील याच पक्षातून केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा याच पक्षातून राजकारणात प्रवेश केला. साहाजिकच आहे बाळासाहेब ठाकरे हे राज ठाकरेंचे काका असल्याने त्यांना त्यांच्याकडून राजकारणाचे उत्तम असे बाळकडू लहानपणापासूनच मिळालेले होते. पण काही वर्षांपूर्वी राज ठाकरेंनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत पक्षातून काढता पाय घेतला आणि स्वतःच्या राजकीय पक्षाची स्थापना केली. परंतु आजही राज ठाकरे यांना शिवसेना हे नाव खूप जवळचे आहे. हे त्यांनी कायमच आपल्या भाषणांमधून व्यक्त केले आहे. काही महिन्यांपूर्वी एका भाषणात राज ठाकरेंनी शिवसेना नाव आणि चिन्हावरून सुरू असलेल्या लढाईवरून नाराजी व्यक्त केली होती. त्यावेळी त्यांनी शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाची सुरू असलेली लढाई पाहाता मला वेदना होत होत्या, असे सांगितले.

राज ठाकरे यांनी शिवसेना पक्षाबाबत व्यक्त केलेल्या मताचा व्हिडीओ काल शिवसेनेचे स्वतंत्र सोहळे पार पडल्यानंतर मनसेकडून ट्वीट करण्यात आला. यावेळी मनसेने काही सवाल देखील उपस्थित केले आहे. “याचसाठी स्व. बाळासाहेब आणि त्यांचे सहकारी रक्ताचं पाणी करून झिजले होते का?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.