नऊ वर्षात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाचे व्रत हाती घेत देशातील सर्व घटकांचा विकास करताना कुठल्याही प्रकारचा भेदभाव केला नाही. त्यामुळे गरिबांच्या कल्याणासाठी 2024 मध्येही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचीच देशाला गरज असल्याचे प्रतिपादन राज्यसभेचे खासदार डॉ.अनिल बोंडे यांनी येथे केले. गुरु गंगाधर स्वामी मंगल कार्यालयात बुधवारी मोदी @9 अभियानांतर्गत लाभार्थी संमेलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
दरम्यान मार्गदर्शन करताना डॉ.अनिल बोंडे पुढे म्हणाले की, नऊ वर्षातील मोदी सरकारचे काम जनतेपर्यत पोहोचवण्यासाठी महाजनसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. 2014 पूर्वी देशात मोठ्या प्रमाणात भ्रष्ट्राचार होत होता. आता त्याला पायबंद घालण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा होत आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. श्रावण बाळ, संजय गांधी योजनेतून आता 1500 रुपये नागरिकांना मिळत आहेत.
अंगनवाडी सेविका, मदतनीस, कोतवाल, आशाताईचे सुद्धा पगार देवेंद्र फडणवीस यांनी वाढवले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे देशातील सर्व जनतेसाठी काम करत आहेत. गरिबाला त्यांच्याकडून प्राधान्य दिले जात आहे. नेरपिंगळाई गावात प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या अंतर्गत 820 घरांना सिलिंडर मिळाले आहे. त्यामुळे महिलांचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होत आहे. कोरोना काळात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अनेक देशाना लस उपलब्ध करून दिल्याने जागतिक पातळीवर भारताची प्रतिमा उंचावल्याने भारत हा जगात स्वाभिमानाने उभा राहत असल्याचेही डॉ. अनिल बोंडे म्हणाले.
