नुसते बोलून चालणार नाही, आता हवा ओबीसी प्रदेशाध्यक्ष; छगन भुजबळांचा प्रदेशाध्यक्षपदावर दावा

मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये धक्कादायक घडामोडी घडत आहेत. आता राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासमोरच मला विरोधी पक्षनेतेपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीत खांदेपालटांच्या चर्चांनी पुन्हा जोर धरला आहे. या घडामोडींवर आमदार छगन भुजबळ यांनीही भाष्य केले असून त्यांच्या वक्तव्यातून प्रदेशाध्यक्षपदासाठी ते इच्छुक असून अप्रत्यक्षपणे त्यांनी या पदावर दावा ठोकल्याचे स्पष्ट होत आहे.

माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, विरोधी पक्षनेते पद जर मराठा समाजाकडे असेल तर अध्यक्ष पद ओबीसी किंवा माझ्याकडे हवं. मला संधी दिली तर मी काम करेन. भाजपाने बावनकुळेंसारखा ओबीसी अध्यक्ष दिला. काँग्रेसनं देखिल दिला. आमच्या पक्षातसुद्धा ओबीसी नेते आहेत. त्यांनासुद्धा संधी दिली पाहिजे. असं भुजबळ यांनी म्हटले आहे.तटकरे, मुंडे, आव्हाड माझ्यासारख्या नेत्यांना संधी द्यायला हवी. मलासुद्धा काम दिलं तर मीसुद्धा करेन असं भुजबळ म्हणाले.

जयंत पाटील हे मागील पाच वर्षांपासून प्रदेशाध्यक्षपदावर कार्यरत आहेत. प्रत्येकी तीन वर्षांनंतर प्रदेशाध्यक्ष हे पद बदलण्याची तरतूद पक्षाच्या घटनेत आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या आजच्या वक्तव्यानंतर शरद पवार काय भूमिका घेणार? याकडे लक्ष लागले आहे. अशातच छगन भुजबळ यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे.पक्ष नेते पदावर एकसमाज व्यक्ती असेल तर प्रदेशाध्यक्ष पदावर दुसऱ्या समाजाची व्यक्ती असावी. विरोधी पक्ष नेते अजित पवार असल्याने प्रदेशाध्यक्ष पदी ओबीसी समाजाचे नेत्याला संधी द्यावी. अशी मागणी भुजबळ यांनी केली आहे.