आयुष्मान भारत आणि महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना एकिकृत पद्धतीने राबवून महाराष्ट्रातील संपूर्ण 12 कोटी नागरिकांना संयुक्त कार्ड देण्यात येणार आहे. या योजनेतून 5 लाखांपर्यंत शस्त्रक्रियेसह उपचार मोफत करण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी दिली.आयुष्मान भारत योजनेची आढावा बैठकीचे आयोजन सह्याद्री अतिथी गृह येथे करण्यात आले. त्यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया बोलत होते.
जनऔषधी केंद्र अधिक संख्येने उघडण्यात येणार असून त्यातून नागरिकांना स्वस्तात औषधी उपलब्ध होणार आहे. जी बाजारपेठेतील औषधांच्या किंमतीपेक्षा अर्ध्या किंमतीत मिळतील. प्रत्येक जिल्ह्यात 50 खाटांचे एक क्रिटिकल केअर युनिट ऑक्सिजन सुविधेसह उघडण्यात येणार आहे. त्यासाठीही केंद्र सरकार मदत करणार असल्याचेही मनसुख मांडविया यांनी सांगितले.
केंद्राच्या यादीप्रमाणे 1900 आजार यात समाविष्ट करुन येत्या 1 महिन्यात 1 कोटी आणि 6 महिन्यात 10 कोटी लोकांना हे कार्ड वितरित करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
प्रधानमंत्री जन आरोग्य व महात्मा फुले जन आरोग्य योजना समन्वयातून राबविल्यास राज्याची आरोग्य यंत्रणा बळकट होणार आहे. यामुळे लाभार्थ्यांना अधिकचा लाभ देणे शक्य होईल. राज्यात सार्वजनिक रुग्णालय एकत्र आणून त्यांच्यासाठी ‘प्रोत्साहन निधी ‘ देण्याची योजना तयार करावी. आयुष्मान भारत डिजिटल मिशन राज्यात प्रभावीपणे राबविण्यात यावे, अशा सूचनाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.
ते पुढे म्हणाले, की महात्मा फुले जन आरोग्य योजनेची प्रति कुटुंब खर्च मर्यादा पाच लाख रुपये करण्यात येत आहे. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची प्रति कुटुंब खर्च मर्यादा देखील सारखीच राहणार आहे. योजनांच्या अंमलबजावणीचे काम मिशन मोडवर करावे. केंद्र सरकारचा निधी पूर्णपणे खर्च करावा, त्यातून राज्याची आरोग्य यंत्रणा बळकट करावी.असंही यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले.
