देशातील १५ विरोधी पक्षांची बिहारमधील पाटण्यात बैठक झाली. त्यांचा अजेंडा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हरवायचा आहे. पण, लालूप्रसाद यादव हे राहुल गांधी यांना म्हणाले लग्न करा आम्हाला तुमच्या वरातीत नाचायचे आहे. त्यामुळे ही बैठक लग्न जमवायला केली होती की मोदी यांना हरविण्यासाठी होती? बैठकीत काही गांभीर्य होते की नव्हते, असा हल्लाबोल केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला. अमेरिकेकडून भारताच्या लोकशाहीचे कौतुक केले जाते. पण, काँग्रेस नेते राहुल गांधी हे परदेशात जाऊन भारताची लोकशाही धोक्यात आल्याचे सांगतात असेही ते म्हणाले.
आळंदीत बोलताना दानवे म्हणाले राहुल गांधींचं लग्न लावण्यासाठी पुढची बैठक शिमल्यात होणार आहे का? असा सवाल करत मिश्किल टिप्पणी केली. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे सध्या पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरूर लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी आज आळंदीमध्ये भाजपचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आलं होतं.
यावेळी रावसाहेब दानवे यांनी आपल्या खास शैलीत विरोधकांवर चौफेर टीका केली. ‘2024 मध्ये देशात पुन्हा एकदा भाजपची सत्ता येईल आणि पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी हेच असतील, असा विश्वास दानवेंनी व्यक्त केला.
२०१४ ते २०१९ दरम्यान केलेल्या कामगिरीमुळे जनतेने पुन्हा केंद्रात भाजपाला निवडून दिले. करोना भारतात येण्यापूर्वी केंद्र सरकारने उपाययोजना केली होती. भारताची लोकसंख्या जास्त असतानाही मृत्यूचे प्रमाण कमी राहिले. कारण, करोना परिस्थिती हाताळण्यात केंद्र सरकारला यश आले. कोरोनाची लस भारताने तयार केली. आंतरराष्ट्रीय स्तरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताची उंची वाढविली. जगाच्या पाठीवर एवढी पत कधीही नव्हती. वाहिन्यांवर मोदी यांच्याशिवाय कोणतीही बातमी नाही. तर पुढे त्यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेत आम्हाला जातीयवादी म्हणणारे शरद पवार , मायावती, उमर अब्दुल्ला, नितीश कुमार , ममता बॅनर्जी या सर्व नेत्यांचे 15 पक्ष आमच्या पंगतीत जेवलेले आहेत. त्यांचे तोंड खरकटे आहेत, अशी खरमारीत टीका देखील त्यांनी केली.
