पाटण्यातील विरोधकांच्या बैठकीवरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला आज उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिलं. “देवेंद्र फडणवीस यांनी परिवारावर बोलू नये, परिवार तुम्हाला सुद्धा आहे. तुमच्या परिवाराचे सुद्धा व्हॉट्सअॅप चॅट बाहेर आलेले आहेत. आम्ही त्यावर बोललेलो नाही. जर आम्ही बोललो तर तुम्हाला शवासन करावं लागेल,” असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. “मी, माझे कुटुंब आणि माझा संपूर्ण भाजपा परिवार एक खुली किताब आहे उद्धव ठाकरे! ज्या ‘व्हॉटसअॅप चॅट’ बाबत तुम्ही बोलताय, ते आरोपपत्राचे भाग आहेत. लपवण्यासारखे आमच्याकडे काहीच नाही. पण, मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या माणसाला इतकी ‘बालबुद्धी’ असावी, याचे मात्र आश्चर्य वाटते,” अशा शब्दात देवेंद्र फडणवीस उत्तर दिलं. त्यांनी याबाबत ट्वीट केलं आहे.
उद्धव ठाकरेंना उद्देशून केलेल्या ट्वीटमध्ये देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मी, माझे कुटुंब आणि माझा संपूर्ण भाजपा परिवार एक खुली किताब (पुस्तक) आहे. ज्या ‘व्हॉट्सअॅप चॅट’बाबत तुम्ही बोलत आहात, तो आरोपपत्राचा भाग आहे. हे न्यायालयाच्या रेकॉर्डवर आहे. ते जाणीवपूर्वक टाकले आहेत. कारण आमच्याकडे लपवण्यासारखं काहीच नाही. पण मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या माणसाला इतकी ‘बालबुद्धी’ असावी, याचं मात्र आश्चर्य वाटते. त्यामुळे त्याची फार चिंता तुम्ही करु नका.”
तर पुढे देवेंद्र फडणवीस लिहतात की, ‘चिंता करायचीच असेल आणि पुस्तक काढायचेच असेल तर यावर काढा सामान्य शिवसैनिकांना वार्यावर सोडून मुख्यमंत्रीपद, मंत्रिपद घरात कसे ठेवले यावर…मुंबईला कुणी लुटले यावर…मृतांच्या टाळूवरील लोणी कुणी खाल्ले यावर…मराठी माणसाला कुणी ओरबाडले यावर…100 कोटींच्या वसुलीचे टार्गेट कसे दिले जाते यावर…तुमचे हिंदूत्त्व आणि तुमचे कारनामे आता एकेक करीत जनतेत उघड होतच आहेत आणि होतच राहणार’.
आम्ही कुणाच्या घरात घुसत नाही. पण, घुसलोच तर त्यांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही. तुमचे ‘नड्डे’ केव्हा सैल होतील, हे समजणार देखील नाही. (नड्डे म्हणजे घसा) तोवर तुमची हास्यजत्रा चालू द्या…बघूच आता शवासन कुणाला करावे लागते ते… असा इशारा देखील फडणवीसांनी दिला आहे.
