मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संवेदनशीलपणा; गरीब वृध्द दाम्पत्याला मदतीचा हात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या गावातून मुंबईकडे जात असताना संवेदनशीलपणा दाखवत पिंपरीतांब गावातील भागडवाडीतील गरीब वृध्द दाम्पत्याला मदतीचा हात दिला. पावसाळ्यापूर्वी अन्यत्र पुनर्वसन करण्याचे जिल्हाधिकारीं जितेंद्र डूडी यांना निर्देश दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मागील तीन दिवसांपासून साताऱ्यातील त्यांच्या दरे गावी मुक्कामी आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कांदाटी खोऱ्यातील पिंपरी गावात गरीब वृद्ध दांपत्याची जबाबदारी स्वीकारून माणुसकीचे दर्शन दिले आहे. मुख्यमंत्र्यांनी कांदाटी खोऱ्यातील पिंपरी गावात राहणाऱ्या विठ्ठल गोरे या गरीब वृद्ध दाम्पत्याला मदतीचा हात दिला आहे.

पिंपरीतांब येथील भागडवाडीतील ७५ वर्षाचे विठ्ठल धोंडू गोरे आपल्या पत्नीसह याठिकाणी राहतात. त्यांची देखभाल करणार कुणीही नसल्याने आहे त्या तुटपुंज्या संसारात ते दोघं उघड्यावरच राहतात. मुख्यमंत्री श्री. शिंदे त्यांच्याजवळ गेले. थेट जमिनीवर बसून त्यांनी त्यांच्याशी संवाद साधला. पावसाळ्यात तुम्ही अशा अवस्थेत कसे राहणार? त्याऐवजी गावाजवळ का राहत नाही असे त्यांना विचारले. मात्र त्यावर त्यांनी काहीही ठोस उत्तर दिले नाही. अखेरीस मुख्यमंत्र्यांनी या दाम्पत्याला पावसाळ्यात लागेल तेवढे अन्न धान्य आणि मदत देण्याचे निर्देश दिले. अशा ठिकाणी राहत असल्याने त्यांना अचानक मदत लागल्यास कुणीही मदत करू शकणार नाही त्यामुळे गावाजवळ राहावे अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी त्यांना केली. साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना या वृद्ध दाम्पत्याचे त्वरित पुनर्वसन करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेहमीच पदाचा मोठेपणा मिरवण्यापेक्षा आपल्या पदाचा सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी कसा वापर करता येईल याचाच विचार करतात आणि ते कृतीतून हे दाखवतात. पिंपरीतांब येथील भागडवाडीतील विठ्ठल गोरे यांना मदत करताना त्यांच्यातली हीच संवेदनशीलता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.