राज्यातील अनेक भागांत मान्सून सक्रीय; एकाच दिवसांत व्यापला राज्याचा मोठा भाग

राज्यात अनेक ठिकाणी मान्सून दाखल झाला आहे. विदर्भात मान्सून पोहचला असून अनेक ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे. पुणे, मुंबईत शनिवारपासून जोरदार पाऊस झाला. पुणे शहरात आज सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. पुणे शहर आणि उपनगरात रविवारी देखील मुसळधार पावसाचा अंदाज पुणे हवामान विभागाने व्यक्त केला आहे. शनिवारी दिवसभर झालेल्या पावसानंतर रात्री पावसाने विश्रांती घेतली होती. पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्याच्या पूर्व भागातील शिंदोडी, चिंचणी, गुनाट, निमोणे, करडे परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली.

तर काही जिल्ह्यामध्ये पुढील ५ दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. सातारा, नाशिकमध्येही ही मुसऴधार ते अतिमुसऴधार पावसाचा अंदाज आहे. हवामानशास्त्र पुणे विभागाचे प्रमुख के एस होसळीकर यांनी याबाबतची माहिती दिल्यानुसार, रायगड आणि रत्नागिरीमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.रायगडमध्ये पुढचे सलग 4 दिवस पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे. मुंबईमध्येही आज सरी बरसण्याची शक्यता आहे. सोमवारी मुंबईमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता आहे.

हवामानशास्त्र विभागाच्या पुणे वेधशाळेचे शास्त्रज्ञ अनुपम कश्यपी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोसमी वाऱ्यांनी मुंबई, पुण्यासह संपूर्ण राज्य व्यापले आहे. त्यामुळे मुंबई आणि पुण्यात मोसमी पाऊस सुरू झाला आहे. विशेष म्हणजे, एकाच दिवसात मोसमी वाऱ्यांनी देशाचा मोठा प्रदेश व्यापला आहे.दरम्यान पुणे आणि परिसरातील गेल्या चोवीस तासांत पडलेल्या पावसाचा आढावा घेतला असता लोणावळा येथे सर्वाधिक ६१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्यानंतर गिरीवन येथे ४२ मिलीमीटर, लवासा येथे ३४.५ मिलीमीटर, एनडीए येथे २९ मिलीमीटर, बारामती येथे २६.६ मिलीमीटर पाऊस पडला.

देशातील अनेक भागांत अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागाने उत्तराखंडमध्ये रेड अलर्ट जारी केला आहे. तसेच उत्तर भारतासह झारखंड, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, गोवा, छत्तीसगड, आसाम, मेघालय आणि महाराष्ट्रात देखील मुसळधार पावसाचा अंदाज आहे.