मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसला सोलापुरात मोठा धक्का बसणार असल्याचे बोलले जात होते. राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके हे बीआरएस पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना जोर धरला होता. त्या चर्चांना आता मूर्त रूप आलं आहे. भालके यांनी आपण आता बीआरएस पक्षात प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलं. मात्र यावेळी त्यांनी बीआरएसमध्ये प्रवेश करण्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसह सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी आपण फक्त आपला स्वाभिमानासाठी बीआरएसमध्ये प्रवेश करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रवादीच्या नेत्यांवर जिल्ह्यात कुणीही विरोधी भूमिका मांडल्यास पहिल्यांदा त्यावर प्रत्युत्तर देण्याचे काम नानांनी केले. त्यामुळे अडचणीच्या काळात राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांकडून आधार, आपुलकी आणि प्रेमाची गरज होती. प्रतिकूल परिस्थितीत कारखान्याला मदत मागितली, पण ही मंडळी मदत करू शकली नाहीत. तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी माझ्याशी सातत्याने संपर्कात राहून आधार देण्याचे काम केले. त्यामुळे आगामी काळात ग्रामपंचायत, नगरपालिका व जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका पूर्ण ताकदीने लढवणार आहे. या ताकदीनंतरच मी विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाणार आहे आणि हे मी मोकळे बोलत नाही, ते तुम्हाला त्या निवडणुकीत दिसून येईल.असं भगीरथ भालके म्हणाले.
पंढरपूर येथील भालके समर्थक, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीतनंतर भगीरथ भालके यांनी ही माहिती दिली. भगीरथ भालके यांच्या बीआरएस प्रवेशामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. कारण त्यांनी पोटनिवडणुकीत एक लाखापेक्षा अधिक मते घेतली आहेत. त्यामुळे भालके यांच्या पक्ष सोडण्याचे परिणाम पंढरपुरात आगामी निवडणुकीत दिसण्याची शक्यता आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे आषाढी एकादशीच्या निमित्ताने 27 जून रोजी पंढरपूरला येणार आहेत. या दरम्यान सकाळी सरकोली येथे शेतकरी मेळावा होणार आहे. या मेळाव्यात भालके आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह बीआरएसमध्ये प्रवेश करणार आहेत.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सोलापूर दौऱ्यापासूनच भगीरथ भालके हे पक्षावर नाराज असल्याचं बोलले जात होते. या दौऱ्यावेळी शरद पवार यांनी अप्रत्यक्षरित्या अभिजीत पाटील यांना उमेदवारी देण्याचे संकेतही दिले होते. तेव्हापासूनच भागीरथ भालके राष्ट्रवादीवर नाराज होते व तेव्हापासूनच ते बीआरएसमध्ये जाणार असल्याच्या चर्चा ही होत्या. मात्र, अखेर आता त्यांनी बीआरएसमध्ये जाण्याचा निश्चित केले आहे.
