उद्धव ठाकरे यांनी जी चूक केली ती शरद पवार यांनी करू नये; संजय राऊतांच पुढचं टार्गेट काँगेस – नितेश राणे

राष्ट्रवादी पक्ष आमच्यासोबत आहे. सर्वजण एकत्र येतील असा मला विश्वास आहे. जो काही निर्णय झाला तो विचारपूर्वक झाला आहे.उद्धव ठाकरे यांनी जी चूक केली ती शरद पवार यांनी करू नये, असं भाजप नेते नितेश राणे यांनी म्हटलं आहे. प्रफुल्ल पटेल यांच्यासह राष्ट्रवादीचे सर्व नेते आमच्यासोबत आहेत, असंही ते म्हणाले आहेत.महाराष्ट्राच्या राजकारणात रविवारी (02 जुलै) पुन्हा एकदा भूकंप झाला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत राजकारणातील एका नव्या अध्यायाला सुरुवात केली. रविवारी राजभवनात पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यामध्ये अजित पवार यांच्यासह पक्षातील इतर 8 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे राष्ट्रवादीत उभी फूट पडली असून आरोप-प्रत्यारोपाला सुरूवात झाली आहे. दरम्यान, खासदार संजय राऊत हे शकुनी मामा आहेत. ठाकरेंनी जी चूक केली ती पवारांनी करू नये, असा हल्लाबोल नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर केला आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार नितेश राणे यांची आज भेट झाली. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. गुरुपौर्णिमेनिमित्त मी गुरूंचं दर्शन घेण्यासाठी आलो होतो.आमच्यामध्ये कोणत्याही प्रकारची राजकीय चर्चा झाली नाही. कार्याकारी अध्यक्ष प्रफुल पटेल हे आमच्यासोबत आले आहेत. राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपची सत्ता आहे.राष्ट्रवादी हा पक्ष वेगळा झाला असून आम्ही सर्व एकत्र आहोत.सर्व आमदार एकत्र आल्यानंतर सर्व परिस्थिती बदलेल आणि हे सरकार मोदींच्या नेतृत्वात काम करेल, असं नितेश राणे म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांच्यासह आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात काम करत आहोत. तर शकुनी मामाचं काम संजय राऊतांसाठी सोडलं पाहिजे. संजय राऊतांकडे वक्तव्यं करण्याशिवाय अजून कोणतीही कामं नाहीयेत. पहिल्यांदा उद्धव ठाकरेंचं घर तोडलं. त्यानंतर पवारांच्या घरात भांडण लावण्याचा प्रयत्न केला. आता राऊतांचं पुढील टार्गेट काँग्रेस आहे. त्यामुळे ते 24 तास त्यांचं काम बरोबरीने करत आहेत. कारण त्यांना इतर कामच नाहीये. सामनातून पगार घेण्याशिवाय त्यांना कुठून पगार मिळतच नाही. उद्धव ठाकरेंनी जी चूक केली तीच चूक पवारांनी करू नये. यांसारख्या शकुनी मामाला दूर ठेवलं पाहिजे, असं म्हणत नितेश राणेंनी टोला लगावला.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच राहतील. पण अंबादास दानवे हे आता विरोधी पक्षनेते राहणार नाहीत, याची काळजी ठाकरे गटाने घेतली पाहिजे. जो काही निर्णय झाला आहे. तो सर्वांच्या सहमतीने झाला आहे. ईडीला ज्या कुणावर कारवाई करायची असेल तो निर्णय ईडी घेईल किंवा ईडी त्यांना जाब विचारेल, असंही राणे म्हणाले.