विरोधी पक्षांकडून गेल्या पाच सहा वर्षांपासून न्यायपालिकेला कमजोर करण्याचा सातत्याने प्रयत्न केला जात आहे. काही लोकांना हाताशी धरून आरोप केले जात आहेत. यातून न्यायपालिकेवर दबाव आणण्याचा विरोधकांचा डाव आहे, असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत फडणवीस बोलत होते.
आपल्या पक्षात सहिष्णूता नाही. 2024 ला भाजप जिंकला तर संविधान राहणार नाही, निवडणूक आयोग राहणार नाही किंवा माध्यमेही राहणार नाहीत, असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे, या प्रश्नावर फडणवीस म्हणाले 2019 लाही असेच आरोप केले जात होते. पण लोकशाही आपल्या जागेवर आहे, न्यायसंस्था आपल्या जागेवर आहे, माध्यमेही आपल्या जागेवर आहेत. एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की आपल्या देशात लोकशाहीची पाळीमुळे खोलवर रुजलेली आहेत. त्याला कोणीही धक्का लावू शकत नाही. एकेकाळी आम्हीही म्हणत होतो की लोकशाही धोक्यात आहे. लोकशाहीला संपवण्याचा प्रयत्न इंदिरा गांधी यांनी करून पाहिला आहे. या देशात दोन वर्ष घटनेने दिलेले मूलभूत अधिकार थिजविण्यात आले होते. देशातील सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांना तुरुंगात टाकले होते. माझे वडीलही दोन वर्ष तुरुंगात होते. ते जनसंघाचे काम करत होते. छोट्या मोठ्या सर्व नेत्यांना तुरुंगात टाकूनही या देशातील लोकशाही संपविता आली नाही.
लोकांनी इंदिरा गांधींना दूर करून लोकशाहीची स्थापना केली. हे सगळे लोक एका सुरात मोदीजींना शिव्या देत असतात. त्यांच्याबद्दल काय काय बोलत नाहीत. कुणी नीच म्हणते, कोणी त्याच्यापेक्षाही असभ्य शिव्या देतात. देशात लोकशाही आहे म्हणूनच शिव्या देऊ शकतात ना असा असा सवाल करून फडणवीस म्हणाले, मी स्वतः वकील आहे. मला एका गोष्टीचे दुःख होते की न्यायपालिकेला कमजोर करण्याचा सातत्याने प्रयत्न केला जात आहे. विरोधी पक्षांनी हे गेल्या पाच सहा वर्षांपासून सुरू केले आहे. काही लोकांना हाताशी धरून न्यायपालिकेवर आरोप केले जात आहेत. न्यायाधीश हे सुद्धा माणसेच असतात. हे करून त्यांना दबावाखाली ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. आपण समतोल राहावे असा प्रयत्न करण्याचा दबाव त्यांच्यावर येईल असे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे.
राजकारणी असूनही मी एक गोष्ट सांगू इच्छितो की न्यायपालिका ही एकमेव संस्था आहे की जिच्यावर लोकांचा विश्वास आहे. हा विश्वास संपवण्याचे काम सुरू आहे. त्यांचा समजून उमजून चाललेला हा डाव आहे. पूर्वग्रह दूषित करणे सुरू आहे.हे अत्यंत चुकीचे आहे. मला असे वाटते की जेव्हा हे लोक म्हणतात की न्यायपालिकेला संपवण्याचा प्रयत्न आहे, तेव्हा त्यांचा भारताच्या घटनेवर विश्वास नाही. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मी आभार मानतो की त्यांनी देशाला अशी घटना दिली आहे की जोपर्यंत सूर्य चंद्र आहेत तोपर्यंत या देशातील लोकशाही कोणीही संपवू शकणार नाही.
